आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करून कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार संबंधित विद्यार्थिनीने पोलिसांत दिली. या प्रकरणी मनाठा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी आरोपींना अटक मात्र झाली नव्हती. नांदेड जिल्ह्य़ातील चाभरा तांडा (तालुका हदगाव) येथील प्राथमिक आश्रमशाळेत हा प्रकार घडला.

चाभरा तांडा येथे ही निवासी आश्रमशाळा आहे. प्राथमिक व माध्यमिक दोन आश्रमशाळा एकाच संस्थेच्या असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. प्राथमिक आश्रमशाळेतील या ११वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या आईसमवेत मनाठा पोलीस ठाणे गाठून शाळेतील शिक्षक शिवानंद डांगे व बालाजी इबितदार यांनी अनुक्रमे ११ व १७ डिसेंबर रोजी आपल्यावर अतिप्रसंग केल्याचे म्हटले आहे. या दोन शिक्षकांनी हे कृत्य करून घडलेली घटना कोणाला सांगितली तर जिवे मारू, अशी धमकी दिल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनाठा पोलिसांनी दोघांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी पीडित विद्यार्थिनींचा स्वतंत्र जबाब नोंदवला. आपल्यावर या दोन शिक्षकांनी कशा प्रकारे अतिप्रसंग केला याचा पाढाच तिने योगेशकुमार यांच्यासमोर वाचला. विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अजून आला नाही. या प्रकरणी डांगे व इबितदार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला, तरी पोलिसांनी आरोपींना अटक मात्र केली नव्हती.