05 March 2021

News Flash

गडचिरोलीत दोन प्रकल्पांवरून रणकंदन

महाराष्ट्र-तेलंगण सीमेवर धरणाचे भूमिपूजन २ मे रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रखेशर राव यांनी केले.

स्थानिक लोकप्रतिनिधी उदासीन, काही विदेश दौऱ्यांवर

कालेश्वरम-मेडीगट्टा धरण आणि सूरजागड लोह प्रकल्पांवरून रणकंदन माजलेले असतांना येथील लोकप्रतिनिधी मात्र त्याबाबत उदासीन आहेत काही लोकप्रतिनिधी विदेश दौऱ्यांवर गेलेले आहेत; त्यामुळे गडचिरोलीची जनता पालकमंत्री, खासदार व आमदारांवर तीव्र नाराज आहेत.

महाराष्ट्र-तेलंगण सीमेवर धरणाचे भूमिपूजन २ मे रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रखेशर राव यांनी केले. या धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील २१ गावे पूर्णत: पाण्याखाली जाणार असल्याने या २१ गावांमधील लोकांनी दोन महिन्यांपासून प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. कॉंग्रेसचे विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार व माजी आमदार दीपक आत्राम यांनी काळे झेंडे दाखवून या भूमिपूजनाला विरोध केला. तिकडे, सूरजागड लोह प्रकल्पाविरोधात सर्वपक्षीयांनी धरणे, मोर्चा, रास्ता रोको आंदोलने केली. परिणामत: लॉयड मेटल्स प्रकल्पाचे काम बंद पडले आहे.  या दोन्ही प्रकल्पाविरोधात गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र उदासीन दिसत आहेत. सिरोंचा व एटापल्लीत या दोन्ही प्रश्नांवर तीव्र आंदोलने सुरू असतानाच गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरीश आत्राम अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. आंदोलनांसंदर्भात त्यांनी अद्याप कुठलीही ठोस भूमिकाही घेतलेली नाही. यासंदर्भात कुणी त्यांना छेडले, तर भूमिपूजनाची कल्पनाच आम्हाला नव्हती, अशी उत्तरे ते देतात. दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही गडचिरोलीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनाही कालेश्वरम-मेडीगट्टा संदर्भातील माहिती नव्हती, असे उत्तर दिले.

गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी तर ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘मेक इन गडचिरोली’ या उपक्रमासाठी मलेशियाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. मलेशियातून ते गडचिरोलीत पाल ऑईल उद्योग, भात संशोधन केंद्र, शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, लघुउद्योग आणण्यासाठी त्या सरकारच्या उपक्रमांची पाहणी करणार असल्याचे समजते. गडचिरोलीत अनेक प्रश्न असतांना आणि कालेश्वरम-मेडीगट्टा व सूरजागडचे आंदोलन सुरू असतांना त्यांचा हा विदेश दौरा चर्चेचा विषय झाला आहे. खासदार अशोक नेते व आमदार कृष्णा गेडाम या दोन्ही प्रश्नावर शांत आहेत. मध्यंतरी सूरजागड प्रश्नावर गावकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले तेव्हा खासदार नेते यांनी एटापल्लीत या प्रकरणी घेतलेली जनसुनावणी लोकांनी उधळून लावली होती. कारण, तिथे लोकांऐवजी लॉयड मेटल्स कंपनीचेच म्हणणे ऐकले जात होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन,‘लॉयड मेटल्सला एटापल्लीत उद्योग सुरू करण्यास भाग पाडू; अन्यथा, खासदारकीचा राजीनामा देऊ,’ अशी घोषणा केली, परंतु भाजपचे केंद्रातील नेतेच या प्रकल्पासाठी घाई करीत असल्यामुळे भाजपचे खासदार, आमदारही अडचणीत सापडले आहेत.

स्थानिक भाजप नेत्यांची दमछाक

स्थानिक पातळीवर भाजपला या दोन्ही प्रकल्पांना विरोध करतांना चांगलीच दमछाक करावी लागत आहे. विरोध केला नाही, तर स्थानिकांची तीव्र नाराजी झेलावी लागून त्याचे परिणाम निवडणुकीत भोगावे लागतील, याचीही जाण या नेत्यांना आहे. त्यामुळेच भाजप नेते एक तर विदेश दौऱ्यावर जात आहेत किंवा या प्रश्नापासून दूर पळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2016 1:32 am

Web Title: two projects disputes in gadchiroli
टॅग : Gadchiroli
Next Stories
1 रिझव्‍‌र्ह बँकेचे आदेश डावलून कृषीकर्जासाठी सातबारा नोंदीचा आग्रह
2 Beef Ban: परराज्यातील गोमांस बाळगण्याला परवानगी, गोवंश हत्याबंदी कायम; हायकोर्टाचा निर्णय
3 शालेय सुट्टीपूर्वी स्कूल बस तपासणी अनिवार्य
Just Now!
X