राज्यातील तीव्र दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दूध दरवाढीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. लिटरमागे २ रुपयांची वाढ शेतकऱ्यांना मिळेल, अशी माहिती महानंद दूध संस्थेच्या अध्यक्ष वैशाली नागवडे यांनी दिली.
महानंद व इफ्को या कंपनीच्या वतीने छावण्यांमधील जनावरांना मोफत पशुखाद्य वाटप करण्यात येत आहे. त्याची पाहणी करण्यासाठी नागवडे यांनी मंगळवारी श्रीगोंदे, कर्जत व जामखेड तालुक्यांचा दौरा केला. विक्रमसिंह पाचपुते त्यांच्यासमवेत होते. कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे विठ्ठल-रुक्मिणी सहकारी पतसंस्थेच्या छावणीस त्यांनी भेट दिली.
नागवडे म्हणाल्या, ‘‘दुधाचे दर वाढवणार म्हटले की त्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ होते. मात्र, गाई व म्हशीला दिला जाणारा खुराकाचा भाव वाढला, अन्य पदार्थाच्या किमती वाढल्या तर त्याची साधी दखलही कोणी घेत नाही. दूधव्यवसाय खऱ्या अर्थाने महिलांचा झाला आहे. गाईच्या धारा काढण्यापासून गोठय़ातील सर्व कामे महिलाच करतात, मात्र यापुढे व्यापारी पद्धतीने हा व्यवसाय केला पाहिजे.’’
विक्रम पाचपुते म्हणाले, दुष्काळामुळे गाईंचे दूध कमी होईल हे लक्षात घेऊन या प्रश्नावर शरद पवार यांनी पुढाकार घेतला. त्यामुळेच महानंद, इफ्को या कंपन्यांनी चांगल्या दर्जाचे पशुखाद्य जनावरांसाठी उपलब्ध करून दिले आहे. पालकमंत्री पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हय़ात हे काम सुरू आहे.