पुण्याहून काशिद येथे सहलीसाठी आलेली दोन शाळकरी मुले समुद्रात बुडाली. यातील एकाचा मृतदेह हाती लागला असून, दुसऱ्या मुलाचा शोध सुरु आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरातील डॉन बॉस्को शाळेची सहल काशिद येथे आली होती. सहलीमध्ये इयत्ता नववी आणि दहावीतील ५८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. सकाळी ११ च्या सुमारास हे विद्यार्थी समुद्रात खेळण्यासाठी पाण्यात उतरले. त्यातील दोन विद्यार्थी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने समुद्रामध्ये ओढले गेले. यात फैजान शेख (वय १४) आणि राकेश जांगीर (वय १८) यांचा समावेश होता.
ही दोन्ही मुले बुडत असल्याची बाब त्यांच्या सहाकांऱ्याच्या लक्षात आली. त्यांनतर स्थानिकांच्या मदतीने मुलांचा शोध सुरु करण्यात आला. तपासा दरम्यान बुडालेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी राकेश जांगीर याचा मृतदेह आढळून आला. तर फैजान शेख याचा शोध सुरु असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुदेश पालकर यांनी सांगीतले. दरम्यान, मुलांसोबत सहलीसाठी आलेले शिक्षक बुडताना थोडक्यात बचावल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
मुरुड – जंजिरामधील काशीदच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक पर्यटक येत असतात. पण सुमद्राला असलेल्या तीव्र उतारामुळे ओहोटीच्यावेळी पर्यटक सहज ओढले जातात. त्यामुळे वारंवार अशा घटना घडतात. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी येथे कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी केली जाते आहे.