पूर्णा तालुक्यात भिंत कोसळून महिला ठार

जिल्हय़ात शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी पहाटे अक्षरश झोडपायला सुरुवात केली. दिवसभर जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले. नदीनाले आणि ओढे काठोकाठ भरून वाहात आहेत. मात्र, पावसाने सगळीकडेच दाणादाण करून टाकली आहे. पिकांसाठी तारणहार ठरलेला पाऊस जिल्ह्यात जीवितहानीलाही कारण ठरला आहे. पालम तालुक्यातील पारवा येथे ओढय़ात बुडून दोन सख्या चुलतबहिणींचा मृत्यू झाला. तर धानोरा काळे या गावी एका महिलेच्या अंगावर भिंत कोसळून तिचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अनेक गावांना पावसाच्या पाण्याचा फटका बसला असून परभणी शहरातही बाहेरील वस्त्यांमध्ये अनेक घरात पाणी शिरले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पूर आल्याने गावांची अंतर्गत वाहतूक ठप्प झाली आहे.

जिल्ह्यात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात ४२.२१ मि. मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस लिमला शिवारात झाला आहे. या शिवारात ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस कोसळायला प्रारंभ झाला असून आज दिवसभरही पावसाचा जोर कायमच होता. शेतातली कामे आज ठप्प झाली, तर अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पूर आले. पालम तालुक्यांतील पारवा येथील कीर्ती सोपान येवले (वय १९ वर्षे) आणि आम्रपाली भगवान येवले (वय ११ वर्षे ) या दोन चुलत बहिणी पुलावरून जात होत्या. सकाळी प्रातविधीसाठी घराबाहेर पडलेल्या या दोघी बहिणी परतत असताना यातल्या एकीचा पाय वाहात असलेल्या ओढय़ाच्या पाण्यात घसरला. पुलावर पाणी असल्याने फरशी कुठपर्यंत आहे याचा अंदाज आला नाही. या पाण्यातून चालत असतानाच एका बहिणीचा तोल गेल्याने दुसरीने तिला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग जोरात होता. या वाहत्या पाण्यातच दोघीही वाहात गेल्या. हे दृश्य काहींनी पाहिले आणि त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. या दोन मुली पाण्यात वाहून गेल्याची बातमी लगोलग पसरली आणि त्यांचा शोधही सुरू झाला. गावातील नागरिक ओढय़ाच्या प्रवाहाच्या दिशेने शोध घेत होते. मात्र, दीड ते दोन किमी वाहात जाऊन या दोघीही अडकल्या. तब्बल दोन तासांनंतर दोघींचेही मृतदेह हाती आले. यावेळी पालम तहसीलदार आर. एम. भेडके यांनी संबंधीत कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेने पारवा या गावी शोककळा पसरली आहे.

पूर्णा तालुक्यात भिंत कोसळून महिला ठार

पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीने तालुक्यातील धानोरा काळे येथील प्रभावती चंद्रकांत गायकवाड या महिलेचा रात्री झोपेतच घराची भिंत अंगावर पडून या ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रात्री एकच्या सुमारास प्रभावतीबाई झोपेत असतानाच भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत कुटुंबातील संघभूषण गायकवाड, सरस्वतीबाई वाघमारे, अनुसयाबाई आसले हे तिघेजण जखमी झाले आहे. घटनास्थळी तहसीलदार शाम मदनुरकर यांनी भेट दिली. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्याने नद्या-नाल्यांना-ओढय़ाना पाणी आल्याने तूर्त तरी पाणीटंचाईचे संकट टळले आहे. मूग, सोयाबीन, उडीद अशी काही पिके पावसाअभावी गेल्यात जमा असली तरी तूर, कापूस, भाजीपाला, फळबागा, हळद, ऊस अशा काही पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. काल झालेल्या पावसात सर्वाधिक नोंद ही पूर्णा तालुक्याची झालेली असून या तालुक्यात ६७.६० मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात परभणी ५०.७५ मि.मी., पालम ४७.६७मि.मी., गंगाखेड ४७मि.मी., सोनपेठ २१मि.मी., पाथरी २४मि.मी., जिंतुर २५.५०मि.मी., मानवत ३७.३३मि.मी. असा पाऊस झाला आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असून सर्वत्र या पावसाने पाणीच पाणी झाले आहे.