देशभरातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व बंदी घातलेल्या सीमी संघटनेशी संबंधित असलेल्या दोन कुख्यात अतिरेक्यांना तेलंगणा पोलिसांनी चकमकीत ठार केल्यानंतर महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) अनेक अधिकारी हैदराबादेत दाखल झाले आहेत. ठार झालेले दोन्ही अतिरेकी दीड वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील खांडवा कारागृहातून त्यांच्या चार अन्य साथीदारांसह पळाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे, बंगळुरू, करीमनगर, खांडवा तसेच देशाच्या अन्य काही ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणांत हे सहा अतिरेकी संशयित होते. सीमीशी संबंधित मोहम्मद खान इस्माईल खान, अमजदखान रमजानखान, अस्लम मो. अयुब खान, मो. एजाजोद्दीन म. अजिजोद्दीन, जाकेर हुसेन बदरुल हुसेन व महंमद सलीम हे सहा जण दीड वर्षांपूर्वी खांडवा कारागृहातून पसार झाले होते. महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथक, राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी व अन्य गुप्तचर यंत्रणा या सहा जणांच्या शोधात होत्या. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात सूर्यपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी तेलंगणा पोलीस एका बसची तपासणी करीत असताना बसमधून प्रवास करणाऱ्या दोघांनी स्वतजवळील शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. यात पोलीस कॉन्स्टेबल व गृहरक्षक दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण तेलंगणा राज्यात अतिदक्षतेचे आदेश जारी करण्यात आले होते.
दोन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर तेलंगणा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. शुक्रवारी मध्यरात्री सूर्यपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दोन संशयास्पद तरूण असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी तेथून पळ काढला. मात्र, काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्यानंतर तेलंगणा पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलाग केला. हा पाठलाग सुरू केल्यानंतर अस्लम मोहम्मद खान व एजाजोद्दीन या दोन दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. चकमकीत पोलीस कॉन्स्टेबल नागा राजू याला वीरमरण आले. पोलीस निरीक्षक बालागणी रेड्डी, उपनिरीक्षक सिद्धार्थ हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर हैदराबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सीमीच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातल्यानंतर महाराष्ट्रातील एटीएसच्या विविध विभागीय कार्यालयांचे अधिकारी हैदराबादेत दाखल झाले. नांदेडचे पथक रात्रीच हैदराबादकडे रवाना झाले. खांडवा कारागृहातून पसार झालेले ६जण बालपणापासूनचे मित्र आहेत. त्यामुळे उर्वरित चौघेही तेलंगणात असण्याची शक्यता गृहीत धरून संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा- विदर्भ हा भाग तेलंगणाच्या सीमेवर येत असल्याने राज्यातील दहशतवादविरोधी पथकही सतर्क झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मृत्युमुखी पडलेले दोघे तेलंगणासह उत्तरप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान व तमिळनाडू पोलिसांना हवे होते. १ फेब्रुवारी २०१४ रोजी तेलंगणातील करीमनगर येथे झालेल्या बँक दरोडा प्रकरणात, तसेच बंगळुरू, गुवाहाटी येथील रेल्वे दरोडय़ांतही याचा सहभाग होता, असे सांगण्यात आले. या सहापकी जाकेर हुसेन याची सासूरवाडी नांदेडची आहे. बनावट आधारकार्ड काढल्याप्रकरणी त्याच्यावर १५ दिवसांपूर्वी नांदेडमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.