लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येने बुधवारी अडीच हजाराचा टप्पा ओलांडला आहे. करोनामुळे जिल्ह्यात आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. २८ नवीन करोनाबाधित रुग्ण बुधवारी आढळून आले, तर रॅपिट टेस्टमध्ये काल काढळून आलेल्या आठ रुग्णांची नोंद आज घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २५२४ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १०४ करोनाबळी गेले आहेत.

जिल्ह्यातील एकूण २५४ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २२६ अहवाल नकारात्मक, तर २८ अहवाल सकारात्मक आले. सध्या ३६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज आणखी एका मृत्यूची नोंद झाली. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील रहिवासी ६० वर्षीय महिला रुग्णाला १५ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आज दिवसभरात २८ जणांचे अहवाल सकारात्मक आले. आज सकाळी १९ रुग्ण आढळून आले. त्यात नऊ महिला व १० पुरुष आहेत. त्यातील अकोट येथील १५ जण तर उर्वरित दगडीपूल, बांबुळगाव, पांढरी व तेल्हारा तालुक्यातील राणेगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. आज सायंकाळी नऊ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यात एक महिला व आठ पुरुष आहेत. त्यामध्ये पातूर तालुक्यातील आलेगाव येथील दोन जण, बोंदरखेड, गोलाबाजार, हिंगणा रोड, जीएमसी, रौनक मंगल कार्यालय, मूर्तिजापूर व अकोट येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आज २३ जणांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील २०५४ जण करोनामुक्त झाले आहेत.