ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातंर्गत येत असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारापेठ येथे बुधवार १० जून रोजी, वाघीण  मृतावस्थेत आढळल्याची घटना ताजी असतानाच, आज दुपारी १२.३० वाजता त्याच वाघिणीच्या अवघ्या वर्षभराच्या दोन पिल्लांचा व दोन माकडांचा मृतदेह तिथून काही दूर अंतरावर एका छोट्या तलावाजवळ आढळून आल्याने, वन खात्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी वाघीण व तिच्या दोन पिल्लांवर पाण्यातून विषप्रयोगाची शक्यता व्यक्त केली आहे.
करोनाच्या टाळेबंदीमुळे जगप्रसिध्द ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बंद आहे. मात्र या बंदच्या काळात व्याघ्र संरक्षणाकडे ताडोबा व्यवस्थापनाचे पुर्णत: दुर्लक्ष झाल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

सितारामपेठ येथे बुधवार १० जून रोजी, दुपारी १ वाजेच्या सुमारास बिट कक्ष क्रमांक ९५६ मध्ये पूर्णवाढ झालेल्या वाघिणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर सितारामपेठ-कोंडेगाव परिसरातून वन विभागाने वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर, वाघिणीचा मृतदेह विषप्रयोग, शिकार की आणखी कशाने झाला याचा शोध घेण्याऐवजी ताडोबा व्यवस्थापन हातावर हात देवून शांत बसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. केवळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे यांनी शवविच्छेदन व पंचनामा केला. मात्र त्यानंतर मृत्यूच्या कारणांचा शोध वन विभागाने घेतलाच नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान तीन दिवसानंतर आज (रविवार) रोजी दुपारी १२.३० वाजता वाघिणीचा मृतदेह मिळालेल्या कक्ष क्रमांक ९५६ पासून काही अंतर दूर एका छोट्या तलावाजवळ वाघिणीचे दोन पिल्लांचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. या पिल्लांचे वय साधारणत: एक वर्षे आहे. विशेष म्हणजे या पिल्लांच्या शेजारीच दोन माकडांचा देखील मृतदेह देखील आढळल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्याने देताच ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी प्रवीण यांचेशी संपर्क साधला असता, बुधवारी मृतावस्थेत मिळालेल्या वाघिणीचीच ही दोन पिल्ल असल्याची माहिती लोकसत्ताशी बोलतांना दिली. तसेच दोन माकडांचाही मृतदेह मिळाला आहे. चारही मृतदेह पूर्णत: कुजलेले अवस्थेत आहेत. प्रथमदर्शनी पाण्यातून विषप्रयोग करून वाघिणीसह  तिची दोन पिल्लं व माकडांच्या शिकारीचा अंदाज क्षेत्र संचालक प्रवीण यांनी बोलून दाखविला. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करित आहोत, घटनास्थळावरचे सर्व सॅम्पल घेतले आहेत असेही त्यांनी सांगितले.