रायगड जिल्ह्यात सहलीसाठी आलेल्या पर्यटकांच्या बुडून मृत्यू होण्याचं सत्र सुरुच आहे. रविवारी काशिद येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या दोघांना बुडून मृत्यू झाला आहे. अभिषेक म्हात्रे आणि पुजा शेट्टी अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावं आहेत.

मुळचा पनवेलचा राहणारा अभिषेक म्हात्रे हा आपल्या दोन मैत्रिणींसोबत मुरुड येथील फार्म हाऊसवर सहलीसाठी आला होता. रविवारी संध्याकाळी अभिषेक आपली मैत्रिण पुजा आणि रोहिणी यांच्यासमवेत काशिद बीच परिसरात समुद्राच्या पाण्यामध्ये उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अभिषेक आणि पुजा हे दोघ बुडाले. दोघही बुडत असल्याचे लक्षात आल्याने रोहीणी हिने बचावासाठी आराडा ओरडा केला. यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचाव कार्य सुरु केले. अभिषेक आणि पुजा यांना बाहेर काढून बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण त्यापुर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. मुरुड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.