तापसरीच्या रुग्णांमध्ये वाढ
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात तापसरीच्या साथीच्या रुग्णात वाढ झालेली असून, वैद्यकीय खात्याने खबरदारी घेतली आहे. कुडाळ तालुक्यातील नेरुरपार व सोनवडेपार ही दोन गावे स्वाइन फ्लू म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या गावातील दोघांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याची माहिती देण्यात आली आहे. कुडाळ तालुक्यातील नेरुरपार नाईकवाडी येथील सानवी गोपाळ नाईक (४) व सोनवडेपार देऊळवाडी येथील निकेतन सुशील धुरी (अडीच वर्षे) या दोन बालकांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे. त्यामुळे सोनवडे व नेरुरपार गावे स्वाइन फ्लूबाधित घोषित करण्यात आली आहेत. याशिवाय भैरवी ताटेचा मृत्यू न्यूमोनियाने झाल्याचे सांगण्यात आले, तसेच कौस्तुभ वैभव हिवाळकर (सरबंळ) व युवराज नीलेश कुडाळकर (कुडाळ) यांना गोवा येथे उपचारासाठी हलविले असता त्यांची प्रकृती सुधारत आहे.
कोल्हापूर व पुण्याची पथके दाखल झाली आहेत. नदीकिनारी गावात तापाची साथ असून, त्याच भागातील बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात बदलत्या पर्यावरणीय वातावरणाचा फटका बसला आहे. मलेरिया, डेंग्यू व स्वाइन फ्लूसदृश साथीचे रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्य़ात प्रयोगशाळा नसल्याने मिरज अगर पुणा येथून अहवाल येईपर्यंत बराच काळ जात आहे. गोवा राज्यातील मणिपाल हॉस्पिटलच्या अहवालाची खबरदारी जिल्ह्य़ातील सरकारी रुग्णालयात घेण्यात आली नसल्यानेच दोन बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्य़ात सरकारी व खासगी रुग्णालयात तापाच्या साथीचे रुग्ण येत आहेत. स्वाइन फ्लूची साथ असल्याने कुडाळ तालुक्यातील दोन गावे घोषित केल्याने हलका ताप आलेले रुग्णही काळजीसाठी रुग्णालयात धाव घेत आहेत. त्यात शालेय मुले व लहान मुलांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे.
सिंधुदुर्गात शासकीय आणि खासगी रुग्णालयांचा समन्वयाचा अभाव तसेच गोवा, बेळगाव व कोल्हापूर येथे अद्ययावत रुग्णालये असल्याने रुग्णांची परवड होत आहे. सरकारी रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयबरोबरच गोवा व कोल्हापूर येथेही रुग्णांची तपासणीसाठी धाव घेतल्याचे सांगण्यात येते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आज एका दिवशी १९८ तापसरीच्या रुग्णाची तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.