|| विजय राऊत

आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या दुचाकी रुग्णवाहिका (बाइक अ‍ॅम्बुलन्स) सेवेतील प्रशिक्षित डॉक्टरांना गेले पाच महिने वेतन मिळालेले नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्य़ातील पाच दुचाकी रुग्णवाहिका सेवा सध्या बंद आहे.

१०८ या मोफत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर दुचाकी रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होत असे. त्यामुळे रुग्णावर प्राथमिक उपचार सुरू करणे शक्य होत होते. ही रुग्णवाहिका प्रशिक्षित डॉक्टरांमार्फत चालवली जात होती. त्यांच्यासोबत आवश्यक औषधे, श्वसनमार्गावरील उपचारांसाठी लागणारी उपकरणे, तसेच इतर वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असत. अपघातात ‘गोल्डन अवर’ काळात रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी ही सेवा आवश्यक आहे.

राज्यातील आदिवासी पाडय़ांवर रुग्णवाहिका जाऊ  शकत नाही. अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा पोहोचविण्यासाठी ही सेवा उपयुक्त आहे.अतिदुर्गम भागांत ही सेवा उपयुक्त ठरली आहे. मात्र पालघर जिल्ह्य़ात डॉक्टरांना गेले पाच महिने वेतनच न मिळाल्याने दुचाकी रुग्णवाहिका संप पुकारण्यात आला आहे. यातील तीन डॉक्टरांनी या सेवेला रामराम ठोकला आहे.

आपत्कालीन परिस्थितीत ही सेवा आता मिळणार नसल्याने आदिवसींच्या चिंतेत भर पडली आहे.या योजनेअंतर्गत सेवा बजावणाऱ्या ज्या डॉक्टरांचा पगार थकीत आहे, त्यांना तो येत्या पाच दिवसांत दिला जाईल आणि ही सेवा पूर्ववत सुरू केली जाईल. – ज्ञानेश्वर शेळके, महाराष्ट्र आपत्कालीन सेवा अधिकारी