News Flash

आंतरजातीय विवाह केला म्हणून दोन महिलांचा खून

आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून तसेच माहेरातून एक लाखाचा हुंडा आणत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी नवविवाहितेचा विष पाजवून खून केला.

| April 23, 2014 04:30 am

आंतरजातीय विवाह केला म्हणून दोन महिलांचा खून

आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून तसेच माहेरातून एक लाखाचा हुंडा आणत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी नवविवाहितेचा विष पाजवून खून केला. तसेच ही घटना पाहणाऱ्या अन्य एका १४ वर्षांच्या मुलीलाही विष पाजवून तिचाही खून करण्यात आला. मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे ही घटना घडली. पतीसह सासू व सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
निकिता मोहन गायकवाड-मळगे (२३) व छकुली नामदेव पुजारी (१४) अशी खून झालेल्या दोघींची नावे आहेत. निकिता हिचे मामा प्रदीप गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निकिता हिचा पती मोहन, सासू पद्मिनी व सासरा विठ्ठल मळगे यांच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह खुनाचा व हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत निकिता हिचा आंतरजातीय प्रेमविवाह मोहन मळगे याजबरोबर अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झाला होता. परंतु सासरच्या मंडळींना हा आंतरजातीय प्रेमविवाह पसंत नव्हता. त्यामुळे सासू व सासरे निकिता हिला, तू खालच्या जातीची आहेस, तू आमच्या घरात शोभत नाही, अशी अपमानकारक भाषा वापरून तिचा छळ करीत असत. यातच माहेरातून एक लाखाची रक्कम आणावी म्हणून पती मोहन याच्यासह सासू व सासऱ्याकडून तगादा लावला जात असे. परंतु सासरची मंडळींकडून नेहमी अपमान व छळ सहन करीत निकिता ही निमूटपणे सासरी नांदत असताना ते सहन झाले नाही. त्यातून पती व सासू-सासऱ्याने निकिता हिच्याबरोबर घरात भांडण काढले. या वेळी तिचा काटा काढण्याच्या हेतूने सर्वानी तिला पकडून बळजबरीने विष पाजले. त्याच वेळी जवळच्या नात्यातील छकुली पुजारी हिने अचानकपणे घरात येऊन हा प्रकार पाहिला. तेव्हा भेदरलेल्या मळगे कुटुंबीयांनी पुरावा नष्ट करण्यासाठी छकुली हिचासुद्धा खून करण्याच्या उद्देशाने तिला बळजबरीने विष पाजले. नंतर या दोघींना सर्पदंश झाल्याचा बनाव केला.
दरम्यान, निकिता व छकुली यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेर दोघींचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाअंती दोघींच्या पोटात विषारी द्रव असल्याचे दिसून आले. या गुन्हय़ाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा दुबुले या करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2014 4:30 am

Web Title: two women killed due to inter caste marriage
Next Stories
1 सांगली जिल्हा बँकेची चौकशी गुप्त ठेवावी
2 सोलापुरातील गारपीटग्रस्त अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत
3 इचलकरंजीत दोन गटांत मारामारी, तोडफोड
Just Now!
X