नोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरल्यास मला फासावर लटकवा, असे मोदींनी म्हटले होते. आता दोन वर्षानंतर नोटाबंदीचा निर्णय चुकीचाच होता हे सिद्ध झाले आहे. खुद्द मोदीही भाषणांमध्ये आता नोटाबंदीवर बोलत नाहीत, असे नमूद करतानाच देशातील जनताच २०१९ मध्ये मोदीना फासावर लटकवेल, ही शारीरिक हत्या नसेल तर राजकीय हत्या असेल, असे विधान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले आहे.

नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘नोटाबंदीला दोन वर्ष पूण झाल्यानिमित्त मी मोदींना त्यांच्याच शब्दांची आठवण करुन देतो. त्यांनी फासावर लटकवा, असे म्हटले होते. आता तुम्हालाच फासावर जायचंय. आम्ही तुमच्यासारखे क्रूर नाहीत. आम्ही तुम्हाला फासावर लटकवणार नाही. देशातील जनताच तुम्हाला फासावर लटकवेल. ही शारीरिक हत्या नसेल. तर ही एक राजकीय हत्या असेल’, असे त्यांनी सांगितले. २०१९ मधील निवडणुकीत जनता मोदींचा पराभव करणार, या उद्देशाने हे विधान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदींनी गरीबांना त्रास देण्यासाठी नोटा बदलल्या. आता जनतेने जशा नोटा बदलल्या तसेच पंतप्रधानांनाही बदलावे. मोदी पुन्हा सत्तेत आले तर लोकांचं जगणं कठीण होईल. देशातील संविधानाला धोका निर्माण होईल. सध्या तसंही लिहिण्यावर- बोलण्यावर निर्बंध आहेत, दोन पक्षांनी एकत्र येण्यावरही निर्बंध आहेत. शकुनी मामासारखं त्रास देण्याचे काम मोदी आणि तडीपार अमित शाह करत असून त्यांच्याविरोधात विद्रोह करण्याची वेळ आली आहे. पाच राज्यांमधील निवडणुकीत आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतही मोदी व भाजपाचा पराभव करावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

नोटाबंदीचा निर्णय चुकीचाच होता आणि याचा सर्वात मोठा पुरावा खुद्द मोदीच आहेत. आता नोटाबंदीबाबत मोदीही भाष्य करत नाही. फक्त अरुण जेटलीच नोटाबंदीचे समर्थन करत आहेत. नोटाबंदीमुळे जीडीपी दीड ते दोन टक्क्यांनी घसरला, १५ ते २० लाख लोकांनी रोजगार गमावला, संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला. अशा परिस्थितीत मी मोदींना त्यांच्या विधानाची आठवण करुन देतो. आता कोणत्या चौकात फासावर लटकायचंय हे मोदींनीच सांगावे, असेही निरुपम यांनी म्हटले आहे.