नागपूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह सुरु असलेल्या या पावसात रामटेक येथे अंगावर वीज कोसळून २ जण ठार झाले आहेत. तर शहरातील हुडकेश्वर नाला परिसरात आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. तर जिल्ह्याच्या विविध भागातून १३५ जणांना वाचवण्यात आले आहे.


दरम्यान, शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील पिपला भागात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने जलमय स्थिती निर्माण झाली होती. यामुळे येथील आदर्श संस्कार विद्यालयात अडकून पडलेल्या ४५० विद्यार्थ्यांची राष्ट्रीय अपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी बोटीच्या माध्यमांतून सुखरुप सुटका केली.

नागपूर शहरात जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे अनेक भागात गुडघाभर पाणी साचले आहे. रस्यांवर वाहने तरंगताना दिसत आहेत. पुढील ४८ तासांत शहर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे विधान भवन भागातील पॉवर स्टेशनमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे विधानभवनाची वीजही गायब झाली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनही आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला असून गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असा इशारा सर्वसामान्यांना देण्यात आला आहे. नागपूर शहरातील पावसाचा परिणाम आजूबाजूच्या भागातही जाणवत आहे.