अलिबाग समुद्र किनाऱ्यावर सहलीसाठी गेलेले दोन पर्यटक बुडाले असून ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर येते आहे. तर दुसऱ्या दोन घटनांमध्ये दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. माथेरान येथे जुम्मापट्टी धबधब्यावरून पाय घसरून एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे तर उरण तालुक्यातील सोनेरी गावात तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे.

मोहपाडा डेकोर या कंपनीत काम करणारे ५ पर्यटक १५ ऑगस्टच्या सुट्टीमुळे सहलीसाठी गेले होते. कुलाबा किल्ला पाहून हे पाचही जण परतत होते त्यावेळी समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघेजण बुडाले ज्यापैकी सुरेश स्वामी याला वाचविण्यात स्थानिक कोळी बांधवांना यश आलं, मात्र सोहराब खान आणि ऋषभ सिल्वा हे दोघेजण खोल पाण्यात बुडाले आणि वाहून गेले, आज दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे, जीव रक्षक आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीनं या दोघांची शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. तर उरणमधील सोनेरी गावात असलेल्या तलावात महेश फड हा तरूण पोहण्यासाठी उतरला होता मात्र या तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे.

माथेरान जवळच्या जुम्मापट्टी येथील धबधब्याजवळ वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकाचा पाय घसरून मृत्यू झाला आहे. १५ ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिवस असल्यानं बहुतांश कंपन्यांना या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात येते, अशावेळी वर्षा सहलींचं आयोजन करण्यात येतं, मात्र यावर्षी अशा प्रकारच्या सहलींमध्ये दोन तरूण समुद्रात बुडाले आहेत ज्यांचा शोध सुरू आहे, तर इतर दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे.