शर्यतीमध्ये अडचण येऊ नये यासाठी घोडीचे अवयव तारेने शिवण्याचा प्रकार सांगलीत उघडकीस आला आहे.

‘अ‍ॅनिमल राहत’ या संघटनेने प्रकाशात आणलेल्या या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्यास २५ हजाराचे बक्षीसही या संस्थेने जाहीर केले आहे.

सांगलीतील इंद्रप्रस्थनगर येथे अ‍ॅनिमल राहत संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेवारस स्थितीत एक घोडी आढळली होती. तिला काही तरी शारीरिक इजा झाली असावी असा संशय आल्याने त्यांनी तिची पाहणी केली. यामध्ये तिचे गुप्तांग तारेने शिवलेले आढळून आले. तत्काळ तिच्यावर वैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार करण्यात आले.

याबाबत संस्थेच्या वतीने कौस्तुभ पोळ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप हा प्रकार कोणी केला हे उघडकीस आलेले नाही.

हे अमानवीय कृत्य करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीसही संस्थेकडून देण्यात येईल असे पोळ यांनी सोमवारी सांगितले.

शर्यतीच्या हंगामात घोडी गर्भार राहू नये, यातून शर्यतीत कुठलाही अडथळा येउ नये, तिची पळण्याची शक्ती कमी होऊ नये यातून हा अमानुष प्रकार केला असण्याचा संशय पोळ यांनी व्यक्त केला.