रायगडमधील महाड तालुक्यातील शिरगांव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाडचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवा सेनेचे विकास गोगावले यांच्यासह सुमारे दिडशे शिवसैनिकांविरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दि. १५ जानेवारी रोजी सोमनाथ ओझर्डे यांनी फेसबुकवर दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबाबत एक बातमी शेअर केली होती. त्यामध्ये बा त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणात चौकशी करून पोलिसांनी ओझर्डे यांना क्लिन चिट दिली होती. मात्र, त्यानंतर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी शिरगाव गावात ओझर्डे यांच्या निषेधाचे बॅनर लावले. सरपंच या नात्याने परवानगी घेवून हे बॅनर लावलेत का? अशी विचारणा केली असता, सव्वाशे ते दिडशे शिवसैनिकांचा जमाव तेथे जमला. त्यात गुप्तीसारखे हत्यार घेऊन आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले देखील होते. आपल्या गाडीवर हल्ला होतोय हे लक्षात येताच ओझर्डे तेथून जावू लागले असता विकास गोगावले , शिवकुमार गुरव यांच्यासह २५ ते ३० शिवसैनिकांनी पाच ते सहा गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि ओझर्डे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने, त्यांच्या दिशेने रिव्हॉलव्हरमधून फायरिंग केली.

याप्रकरणी ओझर्डे यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार विकास गोगावले, शिवकुमार गुरव, तालुका प्रमुख सुरेश महाडिक, सिध्देश पाटेकर, निखील शिंदे, सतिश सकपाळ, नगरसेवक बंटी पोटफोडे, माजी जि.प. सदस्य निलेश ताठरे, अमित पोटफोडे, धनंजय मालुसरे, प्रशांत कदम, प्रफुल्ल धोडगे, सुरेश उर्फ नाना कदम, सुरज कदम उर्फ बाबू जितेश पवार, मनोज पवार, मंगेश भेकरे, सनी भामरे, दत्तात्रेय नवधरे उर्फ अभि, गणेश नवधरे, तुफान पवार, व इतर १२५ ते १५० शिवसैनिकां विरोधात भा.दं.वि कलम ३०७, १४३, १४४, १४७, १४८, ५०४, ५०६ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ७ (अ)(ब), २५, (१ अ अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज गिरी हे करीत आहेत.