आपल्यावर आरोप केलेल्या यु. जी. पाटील यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, असे सांगत शरद पवार यांनी पाटील यांनी केलेल्या कुठल्याही आरोपांना थेट उत्तरे देण्याचे टाळले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साता-यात आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेत शरद पवार यांनी हुकूमशाही आणल्याची टीका संस्थेचे कार्यकारिणीचे सदस्य असलेले पाटील यांनी नुकतीच केली होती. याशिवाय संस्थेच्या कार्यकारिणीवर कुटुंबातील सदस्यांना, राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना सामावून घेणे, नेमणुका-बदल्यांमध्ये भ्रष्टाचार, स्वत:च्या हयातीत शैक्षणिक संस्थांना स्वत:ची नावे देणे आणि संस्थेच्या मूळ घटनेत बदल करण्याचे गंभीर आरोपही त्यांनी पवारांवर केले होते. या आरोपांना पवार काय उत्तर देतात याकडे सगळय़ांचे लक्ष होते. पण या आरोपांबाबत प्रश्न येताच पवार यांनी आरोपांना उत्तर देण्याचे टाळत पाटील यांची मानसिक स्थिती बिघडलेली असल्याचे सांगत त्यांच्यावरच हल्ला चढवला.
पाटील यांच्यावर टीका करताना ते पुढे म्हणाले, संस्थेच्या आज झालेल्या बैेठकीत त्यांना संस्थेतून काढून टाकण्याचा ठराव एकमताने झाला. मात्र, आपणच असे निर्णय वैयक्तिक द्वेषापोटी घेऊ नका, असे सांगितले. तसेच या बठकीत हा विषय घेण्याएवजी ‘काैन्सिल’च्या बैठकीत त्यावर चर्चा करा आणि मग निर्णय घ्या, अस सूचवले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.