शिवसेनेवर टीका करणाऱ्याना ग्रामपंचायत जिंकता आली नाही. अशांना मंत्री केल्याने शिवसेनेला फरक पडत नाही. भाजपाने कोकणातले पंतप्रधान केले तरी शिवसेना संपणार नाही, अशा शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी नारायण राणे यांच्यावर प्रहार केला.

शिवसेनेने राज्यभरात सुरु केलेल्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात कोल्हापूरातल्या शिवसंपर्क मेळाव्याने करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसंपर्क प्रतिज्ञा देत अभियान राबविण्याचे अभिवचन दिले.

हेही वाचा – काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर उद्धव ठाकरेंनी लगावला टोला; म्हणाले…

अंगावर आले की शिंगावर घेण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. आम्ही कोणाकडे शिंग घेवून मारायला जात नाही. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृतीतून उत्तर देत आहेत,असा उल्लेख सामंत यांनी केला. ते म्हणाले, “ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा धसका घेवून विरोधकांनी शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. पण, शिवसंपर्क अभियानाच्या १२ दिवसात भगवे वातावरण करून विरोधकांचे १२ वाजविल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत”.

आणखी वाचा -“शरद पवारांनी नाना पटोलेंना छोटा माणूस म्हणणं हीच….,” शिवसेनेने मांडली स्पष्ट भूमिका

संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी, शिवसेनेत काम केलेल्या जेष्ठांना मान-सन्मान द्या, त्या जाणकार फळीची मदत लोकसंपर्कात घ्या. जागृत व्हा, अन्यथा पक्षाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. ज्यांनी शिवसेनेशी कपटगिरी केली त्यांचा अंत निश्चित आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना सामंत यांनी यावेळी केल्या.

माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, आमदार प्रकाश आबीटकर, सत्यजित पाटील, मंगल साळोखे उपस्थित होते.