आगामी निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याचे संकेत असल्याने प्रत्येक मातब्बर नेता येथील प्रत्येक विभागात स्वतचा दबावगट सक्रिय करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातही या लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, मंडगणगड विधानसभा क्षेत्र समाविष्ट असल्याने येथेच मातब्बर नेत्यांचे विशेष लक्ष आहे. आतापर्यंत सुनील तटकरे, भास्कर जाधव यांच्या प्रभावाखाली असलेल्या या विभागात पालकमंत्री उदय सामंतही नव्याने स्वतचे स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे संकेत मिळत आहेत. साहजिकच येथील शिवसेनेच्या अनंत गीते, सूर्यकांत दळवी आणि रामदास कदम यांच्या त्रयीप्रमाणेच राष्ट्रवादीही त्रिशंकू अवस्थेकडे सरकत असल्याची चिन्हे आहेत.
सारंग येथे गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात सारंग मोहल्ला, मांदिवली मोहल्ला आणि पाजेतील शिवसेना कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश म्हणजे उदय सामंत यांचा या विभागातील शक्तिप्रदर्शनाचाच भाग असल्याचे संकेत मिळत आहेत. मुळात या विभागावर सुरुवातीपासूनच रायगड जिल्ह्यातील सुनील तटकरे यांचा वरचष्मा होता. पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरील कोकणचे नेतृत्व म्हणून दबदबा निर्माण करण्यात ते एका अर्थाने यशस्वीच झाले होते. पण नंतर शिवसेनेचे बंडखोर भास्कर जाधव यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभाव ओसरू लागला.
चिपळूणमधील भास्कर जाधव यांना पालकमंत्रीपद मिळाल्याने त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात त्यातही उत्तर रत्नागिरीवर चांगलीच पकड मिळवली. साहजिकच दापोली ते चिपळूणपर्यंत सुनील तटकरे यांच्यापाठोपाठ भास्कर जाधव यांचा दबागट प्रभावी ठरतो आहे. सध्या दक्षिण रत्नागिरीत स्वतचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले युवा नेते उदय सामंत यांनी वरिष्ठ स्तरावर अल्पावधीतच आपली वर्णी लावल्याचे स्पष्ट झाले. त्यातूनच त्यांना मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद मिळाले. या प्रमोशनमुळे पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साहाचे वातावरण पसरले. दुसऱ्या बाजूला आधीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांना पक्षाने थेट प्रदेशाध्यक्षपदी बसवल्याने येथे त्यांच्या संपर्कमोहिमांबाबत मर्यादा येऊ लागल्या. आता तर युवा फळीतून मुख्य प्रवाहापर्यंत सक्षमपणे प्रवास करणाऱ्या उदय सामंत यांनी साहजिकच जिल्ह्यातील मातब्बर नेतेपदाच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उदय सामंत यांचा नवीन दबावगट सक्रिय झाल्यास सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यापाठोपाठ तेही दापोली विधानसभा मतदारसंघातील राजकारणात निर्णायक भूमिका बजावण्यास सक्षम ठरतील. रायगड लोकसभा मतदारसंघ सुनील तटकरे यांच्या वाटय़ाला आल्यास भास्कर जाधव यांच्या दबावगटाकडून त्यांना प्रत्यक्ष धोका निर्माण होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांत वर्तवण्यात येत आहे. त्या पाश्र्वभूमीवर दापोलीच्या राजकीय क्षितिजावर उदय सामंत यांच्या रूपाने होत असलेला नवीन दबावगटाचा उदय पक्षाला कसा फायदेशीर ठरू शकतो, याकडे सर्वाचे लक्ष वेधले जाते आहे.