राजभवनामधील १८ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावरुनच परीक्षा घेणं किती धोकादायक आहे हे दिसून येत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. दिवसेंदिवस राज्यातील करोना बाधितांचा आकडा वाढत असताना राजभवनातील जवळपास १८ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्याच पार्श्वभूमीवर सामंत यांनी ट्विटवरुन मत व्यक्त करताना परीक्षा घेण्यासाठी वातावरण सुरक्षित नसल्याचं ट्विटवरुन म्हटलं आहे.

शनिवारी महानायक अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर सकाळी राजभवनातील कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आलं. याचसंदर्भात ट्विट करताना सामंत यांनी, “राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अशा सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला. आता तरी एचआरडी आणि युजीसीला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे. आता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का?,” असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यापूर्वी सामंत यांनी राजभवनामध्ये १८ कर्मचारी करोना पॉझिटीव्ह सापडल्यामुळे राज्यापालांनाही तब्बेतीची काळजी घ्यावी असं ट्विट केलं होतं. “राजभवनात १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळते आहे. माननीय महामहिम राज्यपाल महोदयांनी देखील स्वतःच्या तब्बेतीची देखील काळजी घ्यावी,” असं ट्विट सामंत यांनी केलं आहे.

राज्य सरकारने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांबरोबरच कोणत्याही परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतलेला असतानाच विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील भूमिका घेतल्याने यावरुन वाद सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर सामंतांनी हे ट्विट करुन परीक्षा घेणं विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचं मत व्यक्त करत राज्य सरकारची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

राजभवनातील १०० जणांची झाली चाचणी…

राजभवनातील जवळपास १८ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील १०० कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी १८ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं चाचणी करण्यात आली आहे.