आरक्षणाबाबत निर्णय होईल, लोकांनी तोडफोड-जाळपोळ करू नका, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे. तसेच सरकारने कागदी घोडे नाचवणे थांबावावे अन्यथा आंदोलक कायदा हातात घेतील. त्वरीत तोडगा काढा, नाहीतर उद्रक होईल, असा म्हणत मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका, असा इशाराही दिला. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज पुण्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील १०० हून अधिक समन्वयकाच्या उपस्थितीत मराठा आरक्षण परिषद झाली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. समन्वयकांनी केलेल्या सूचनांचे निवदेन मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले, सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत अनेक बळी गेले आहेत. मुलभूत अधिकारांसाठी भिकाऱ्यासारखे फिरण्याची वेळ आली आहे. वेळीच आरक्षण दिले असते तर आयोगाची गरज भासली नसती. आरक्षणासाठी जीव देणारे, जीव घेतील, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत. आम्ही कायदा हातात घेतला तर सरकारच जबाबदार असेल. जी काही परिस्थिती निर्माण होईल, त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आरक्षणावरून सरकार किती मौन बाळगणार असा सवाल करत सरकारने संगीतखुर्ची थांबवली पाहिजे, असे म्हटले.

काय म्हणाले उदयनराजे…

कायद्याचे कारण पुढे करत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवू नका. ८२ टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती पाहिली पाहिजे. मराठा समाजात मागासांची संख्या जास्त आहे. मागील ३० वर्षांपासून आरक्षणावर फक्त चर्चाच सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्यावर एवढी चर्चा कशाला. आजी-माजी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आरक्षण प्रश्न चिघळला. समिती, आयोग यातच ही वर्षे वाया गेली. संपूर्ण एक पिढी ऐन उमेदीच्या काळात वंचित राहिली आणि संपूर्ण दिशाहीन झाली.

महाराजांचे नाव घेणाऱ्यांनो त्यांचे विचारही रूजवा. आत्महत्या थांबवा, आरक्षण लवकर द्या. आरक्षण देणार नसेल तर सांगा. पण कागदी घोडे नाचवण्याचे काम बंद केले पाहिजे. मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका. हात जोडून विनंती करतो, नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. जी काही परिस्थिती निर्माण होईल, त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. जातीजातीमध्ये तेढ निर्माण झाल्यास सरकार, न्यायदेवता आणि प्रशासन जाबाबदार असेल.