प्रशिक्षणार्थी वकिलांच्या गराड्यात उदयनराजेंची ‘आप की अदालत’

लोकसभा निवडणुकांचा जसजसा फिव्हर वाढत चालला आहे, तसतशी सातारा लोकसभेच्या प्रचाराला धार येवू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे यांनी महाविद्यालये व शैक्षणिक संकुलांमध्ये तरुणाईच्या भेटी गाठींचा धडाका लावला आहे.  खा. उदयनराजेंनी सातार्‍यातील विधी महाविद्यालयास भेट देवून प्रशिक्षणार्थी विधीज्ञांशी संवाद साधत आपल्या हटक्या स्टाईलने त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. एकूणच उदयनराजेंच्या या अल्हाददायक सर्जिकल स्ट्राईकने प्रशिक्षणार्थी विधीज्ञही भारावून गेल्याचे चित्र येथील विधी महाविद्यालयात निर्माण झाले.

युतीकडून युतीच्या उमेदवाराची आजपासून मतदारांच्या जनसंपर्काला चाचपडत सुरुवात झाली असली तरी सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उदयनराजेंनी मात्र भर उन्हाळ्यात लोकांच्या जनसंपर्काचा धडाका लावला आहे. पायाला भिंगरी बांधून गेल्या आठवड्यापासून खा. उदयनराजे प्रचारासाठी फिरत आहेत. यंदा उदयनराजेंनी तरुणवर्गाला आपला प्रचाराचा केंद्रबिंदू मानून आपली रणनीती आखली आहे. खा. उदयनराजेंच्या स्टाईलची स्थानिक ते देशपातळीवरील माध्यमे दखल घेत असतात. अनेकदा उदयनराजेंना फक्त टीव्ही वाहिन्यांवरच अनेकांनी पाहिलेले असते. त्यामुळे साहजिकच उदयनराजेंना प्रत्यक्ष पाहण्याची संधी कोणताही तरुण दवडत नाही. सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उदयनराजेंनी महाविद्यालये व शैक्षणिक संकुलांमध्ये भेटीचा धडाका लावल्यामुळे तरुणाईला उदयनराजेंना याची देही याची डोळा पाहण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

खा. उदयनराजे यांनी सातारा येथील इस्माईलसाहेब मुल्ला विधी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी अनेक प्रशिक्षणार्थी विधीज्ञांनी उदयनराजेंना प्रश्‍न विचारले. उदयनराजेंनीही आपल्या हटके स्टाईलने त्यांच्या प्रश्‍नास उत्तरे दिली. उदयनराजेंच्या या ‘आप की अदालत’मध्ये उदयनराजेंना ‘एक बार मैने कमिटमेंट कर दी, तो मै अपने आप की भी नहीं सुनता’ असा डायलॉग मारुन उदयनराजे कॉलर उडवायलाही विसरले नाहीत. त्यामुळे  सातार्‍यातील विधी महाविद्यालयात रंगलेल्या उदयनराजेंच्या अदालतीची चर्चा जास्त होती.