05 July 2020

News Flash

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात कामं घेऊन जायचो, मात्र पदरी कायम निराशाच : उदयनराजे

साताऱ्यात उदयनराजे, शिवेंद्रराजेंकडून मुख्यमंत्र्यांच्या महा जनादेश यात्रेचे जल्लोषात स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महा जनादेश यात्रेचे सातारा येथे आज दुपारी आगमन झाल्यानंतर आयोजित सभेच्या ठिकाणी उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपाच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतांना सर्वप्रथम शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना तलवार भेट दिली तर उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना पारंपारिक राजेशाही पगडी घालून त्यांचे स्वागत केले. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी उदयनराजेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी काँग्रेस -राष्ट्रवादीला पक्षाची आज झालेल्या अवस्थेबद्दल आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला.

यावेळी भाजपा प्रवेशानंतर प्रथमच जाहीर सभेत बोलताना उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. लोकसभा निवडणुका पार पडून केवळ तीन महिनेच झालेले असताना खासदारकीचा राजीनामा का दिला? याबाबत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकार काळात जनतेची घेऊन गेलेली कामं कधीच झाली नाहीत. माझ्याकडून नेण्यात आलेल्या कामांच्या प्रस्तावांना कायम केराची टोपली दाखवली गेली, तरीपण मी १५ वर्षे सोबत होतो, खरतर याबाबत राष्ट्रवादीने मला सहनशीलतेचा पुरस्कार द्यायला हवा होता. शिवाय निवडणुकीत माझ्या मताधिक्क्यात झालेल्या घसरणीमुळे मी तो नैतिकदृष्या माझा पराभव मानतो असेही ते म्हणाले. तसेच काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सरकारकडे कामं घेऊन गेलो तर पदरी कायम निराशाच पडली. जी कामं झाली ते मी स्वतः रेटून केली असे सांगत, सत्तेत असताना एक रुपयाचेही काम झालं नसल्याचा त्यांनी आरोप केला.माझा केवळ उमेदवारी देण्यापुरताच राष्ट्रवादीने उपयोग करून घेतल्याचे सांगून मला पक्षाने न्याय दिला नाही, म्हणून खासदार झालेलो असतानाही काम करणाऱ्यांबरोबर राहायचे की, काम न करणाऱ्याबरोबर राहायचे याचा विचार करून मी खासदारकीचा राजीनामा दिल्याचे उदयनराजेंनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना  उदयनराजे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील मुख्यमंत्री असताना जिल्ह्यामध्ये शेतकी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, साताऱ्याला आयआयटी, आयएम आदींबाबत अनेक कामे मी त्यांना सुचवली. मात्र त्यांनी या कामांना  कायम केराची टोपली दाखवली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांचे कौतुक करताना ते म्हणाले की,  मी विरोधी खासदार असूनही केवळ मैत्रीच्या निमित्त मला सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला व माझे अनेक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले. शिवाय सातारा जिल्ह्यातील पर्यटन, स्ट्रॉबेरी उद्योग, आरोग्य, गोदावरी नदी प्रमाणे कृष्णा नदी स्वच्छता, राष्ट्रीय महामार्ग, साताऱ्याची औद्योगिक वसाहत, झोपडपट्टी निर्मुलन, मुख्यमंत्री आवास, पाटण कराड येथील पूरग्रस्तांचे पुनर्वसन आदी कामांमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे ते म्हणाले. कृष्णा खोरे महामंडळाची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर सातारा जिल्ह्याचा दुष्काळ दिसला नसता अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे पाहून मी हे पाऊल उचलले आहे. माझ्यावर सोशल मीडियातून टीका करणाऱ्यांनी मलाही थोडे समजून घेतले तर मी राजीनामा दिलेला त्यांनाही ते पटेल, असेही त्यांनी म्हटले. कोण काय बोलत आहे याकडे मी लक्ष देत नाही परंतु जनतेची होणारी फसवेगिरी आता उघड झाली आहे, असे सांगत हे आपले सरकार आहे सर्वांनी या सरकारच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ईव्हएमच्या मुद्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, जनता शेवटी कामांकडे पाहून मतदान करते. हे सरकार कामं मार्गी लावणारं सरकार आहे, म्हणूनच जनतेने या सरकावर विश्वास ठेवला. त्यामुळे ईव्हीएमच्या मुद्यावरून माझ्या मनात असलेल्या प्रश्नांच मला उत्तर मिळालं असल्याचेही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.

या अगोदर शिवेंद्रराजेंनी आपण मंत्रिपदासाठी भाजपात गेलो नसल्याचे सांगत, साताऱ्याच्या विकासासाठी भाजपात प्रवेश केला असल्याचे सांगितले. शिवाय कोणत्याही चौकशीला घाबरूनही आपण भाजपात गेलो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपतींना मागणी करायची नाही, तर आदेश द्यायचा असतो – मुख्यमंत्री
छत्रपतींना मागणी करायची नाही, तर आदेश द्यायचा असतो. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे व शिवेंद्रराजेंनी मागणी केलेली सर्व कामे आपण मार्गी लावणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच, या दोन्ही राजांनी भाजपात प्रवेश करताना कोणतीही अट ठेवली नाही. केवळ जनतेच्या कामांची यादी दिली असल्याचेही ते म्हणाले. तर राष्ट्रावादीच्या नेत्यांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत या दोन्ही राजांनी तुम्हाला इतकं दिलं याचा तुम्हाला विसर पडला आहे. छत्रपतींच घराणं हे देणारं आहे, घेणारं नाही असंही ते म्हणाले. तसेच विधानसभेबरोबर आगामी लोकसभा पोटनिवडणुकीत या दोघांनाही प्रचंड मताधिक्क्यांनी निवडून आणा असे त्यांनी यावेळी जनतेला आवाहन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 7:23 pm

Web Title: udayan raje shivendra raje welcomed chief ministers maha mandesh yatra in satara msr 87
Next Stories
1 शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा
2 उदयनराजेंच्या प्रवेशावरून रोहित पवारांचा भाजपाला सल्ला, म्हणाले…
3 राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर शरद पवार भडकले
Just Now!
X