पाटण तालुक्यातील प्रश्नांची जाण उदयनराजेंना असल्यामुळे आपल्या व्यथा तेच केंद्र सरकारपुढे आक्रमकपणे मांडू शकतील, त्यासाठी त्यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून देऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांना ताकद द्यावी, असे आवाहन आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.
सातारा लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे विशेष म्हणजे माजी खासदार व सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील व पाटणकर गट दीर्घ कालावधीनंतर व्यासपीठावर एकत्र आले होते. ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सारंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, की हा जिल्हा थोर पुरुषांची भूमी, चळवळ, सत्यशोधक चळवळींचा जिल्हा आहे. जिल्ह्याने राज्य आणि देशाला दिशा देण्याचे काम केले. अशा स्वाभिमानी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी होण्याचा बहुमान मला मिळाला आणि दुस-यांदा खासदार होण्याची संधी आपणा सर्वामुळे मिळणार आहे. या संधीचा उपयोग मी पाटण तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या तालुक्यातून जाणाऱ्या कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होत असून, हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प झाल्यास कोकण व पश्चिम महाराष्ट्र एकमेकांना जोडला जाऊन व्यापार, रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
सारंग पाटील म्हणाले, की गुजरातचे राजकारण एका व्यक्तीभोवती फिरते आहे. विकास पुरुष म्हणून त्यांची निर्माण केलेली प्रतिमा हे थोतांड आहे. देशात गुजरातचा विकासात १२ वा क्रमांक लागतो. याउलट महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. या तालुक्याने प्रतिष्ठेचे केंद्रीयमंत्री, राज्यपाल व मुख्यमंत्री अशी मानाची पदे दिली आहेत. परिणामी, या विभागाचा विकास साधला गेला. आणखी भरीव विकासासाठी उदयनराजे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्याच्या प्रारंभी ज्येष्ठ नेते भागवतराव देसाई व विलासराव पाटील-वाठारकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी स्थानिक नेत्यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.