X

शरद पवारांच्या पूर्वीच्या कारमध्ये ‘फिल गुड फॅक्टर’ जास्त, उदयनराजेंचे सूचक वक्तव्य

शरद पवारांबाबत मला नितांत आदर-उदयनराजे

शरद पवार आणि उदयनराजे यांचा एकाच कारमधील प्रवास बुधवारी चर्चेचा विषय ठरला. अशातच पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या पहिल्याच प्रश्नाला उदयनराजेंनी सूचक उत्तर दिले. ‘उदयनराजे तुम्हाला महागड्या कार वापरण्याचा छंद आहे. अशात आज शरद पवारांसोबत येताना फिल गुड वाटले का?’ असा प्रश्न उदयनराजेंना विचारण्यात आला. त्यावर क्षणाचाही विलंब न करता, अहो आमची हीच चर्चा आहे, पण शरद पवारांकडे पूर्वी जी लँड क्रूझर कार होती. त्यामध्ये जास्त छान वाटते असे सूचक वक्तव्य उदयनराजे यांनी केले. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे हे राष्ट्रवादीवरच नाराज आहेत अशा चर्चांना उधाण आले आहे. अशातच आज धक्कातंत्राचा वापर करत उदयनराजे यांनी शरद पवारांच्या कारचे सारथ्य केल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.

बुधवारी पत्रकारांशी बोलताना शरद पवारांची आधीची कार फिल गुड होती, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. शरद पवारांच्या कारचा क्रमांक ३३३ असा आहे, असे सांगत त्यावर हास्य विनोद करत त्यांनी हा मुद्दा मांडला. नारायण राणे यांना भाजपने थांबवले का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की कोणी कोणाला थांबवले हे मला ठाऊक नाही. मात्र मी कोणालाही थांबवत नाही, मी मलाच थांबवतो कारण माझ्या कारचा ब्रेक माझ्याकडेच असतो. त्यामुळे कुठे थांबायचे हे मला ठाऊक आहे. बाकी नारायण राणेंनी पक्ष काढला त्यावर फार काही बोलणार नाही कारण मी ज्योतिषी नाही, मला इतकेच वाटते की त्यांच्या पक्षाचे भवितव्य काळच ठरवेल.

शरद पवारांबाबत आपल्याला नितांत आदर असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे समर्थक आणि राष्ट्रवादीचे समर्थक यांच्यात वाद होत आहेत. याबाबत काही बोलणे झाले का? असे विचारले असता मी ‘इंटरनॅशनल’ माणूस आहे कोणाच्या तक्रारी करणे हा माझा स्वभाव नाही. बुधवारी शरद पवार आणि उदयनराजे एकत्र आल्याने गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम मिळाल्याचे दिसते आहे. पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचेही सगळे आरोप खोडून काढले आहेत.

  • Tags: sharad-pawar, udayanraje,
  • Outbrain