शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घातलेल्या धुडगुसामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात शिवेंद्रराजे यांचे निवासस्थान असलेल्या ‘सुरूचि’ बंगल्यावर दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. त्याठिकाणी हाणामारी आणि दगडफेक झाली होती. यानंतर पोलिसांनी काही संशयित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, जेलमध्ये जावे लागू नये म्हणून छातीत दुखत असल्याचे कारण सांगून हे आरोपी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. यापैकी काहीजणांना शनिवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर या संशयित आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी रुग्णालयात एकच जल्लोष केला. तब्बल १५ मिनिटे हे सर्वजण रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये गाण्यावर नाचत होते. विशेष म्हणजे या सगळ्यात उदयनराजे भोसले गटाचे कार्यकर्तेही सामील झाले. शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांना जामीन मिळाला मग आता आपल्यालाही जामीन मिळेल या भावनेने उदयनराजेंचे कार्यकर्तेही बेधुंद होऊन नाचत होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाव घेत हा धुडगूस थांबवला.

मात्र, या प्रकारामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले असून पोलिसांना त्याची उत्तरे द्यावी लागत आहेत. न्यायालयाने या घटनेचा अहवाल पोलिसांकडून मागवल्याचे समजते. तसेच या अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांवर महिन्यांपासून कोणते उपचार सुरू आहेत, याची माहितीही मागवण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सगळ्या धुडगुसात सध्या अटकेत असलेले दोन्ही गटाचे कार्यकर्ते सामील नव्हते, असा अहवाल पोलिसांकडून सादर केला जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी एका पथकाद्वारे संशयितांची झाडाझडती घेतली. त्यांनी अचानक प्रिझन वॉर्डमध्ये धडक मारल्यानंतर संशयित आरोपी गांगरून गेले. न्यायालयीन कोठडीत असताना या संशयितांकडे मोबाईल असल्याचा पोलिसांचा कयास होता. त्यानुसार पोलिस संशयितांची तपासणी करत होते. या झाडाझडतीबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली होती.

सुमारे साडेतीन महिन्यांपूर्वी आनेवाडी टोल नाकाप्रकरणी सातार्‍यात सुरुचि बंगल्याबाहेर जोरदार धुमश्‍चक्री झाली होती. यावेळी खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तोडफोड व गोळीबार झाला होता. आमदार शिवेंद्रराजेंचे काही कार्यकर्ते या टोलनाक्यावरून जात होते. त्यापैकी काही जणांची उदयनराजेंच्या समर्थकांसोबत बाचाबाची झाली ज्यानंतर त्याचे रूपांतर राड्यात झाले. उदयनराजे भोसले यांनी त्या कार्यकर्त्यांच्या कारचा पाठलाग केला. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकही होतेच. शिवेंद्रराजे यांच्या सुरुची बंगल्यापर्यंत हा पाठलाग करण्यात आला, ज्यानंतर राडा आणि दगडफेक सुरु झाली आणि वाद आणखी चिघळला होता.