उदयनराजेंचे साताऱ्यात शक्तिप्रदर्शन

उद्योगपतीकडे खंडणी मागणे आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल झालेले खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी रात्री साताऱ्यात दाखल होत शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या या कृतीनंतर पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले तर त्यांच्यावरील कारवाईस विलंब करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचे संकेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापुरात दिले आहेत.

लोणंद (ता खंडाळा ) येथील ‘सोना अ‍ॅलाईज’ कारखान्याचे मालक व व्यवस्थापक राजीव जैन यांना खंडणी मागणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अन्य नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उदयनराजेंविरुद्धही अटकेचे आदेश निघालेले आहेत. याप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज नुकताच फेटाळून लावल्याने ते सर्वोच्च न्यायालयात जाणार की स्वतहून पोलिसांत हजर होणार याबाबत चर्चा सुरू होती. या पाश्र्वभूमीवर पोलीस दप्तरी ‘बेपत्ता’ असलेले उदयनराजे शुक्रवारी संध्याकाळी साताऱ्यात दाखल झाले. या वेळी त्यांनी शेकडो समर्थकांसह शहरातून मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले. घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजीही या वेळी करण्यात आली. वाटेत त्यांनी त्यांचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचीही भेट घेतली. यानंतर ते त्यांच्या जलमंदिर निवासस्थानी गेले. या संपूर्ण मिरवणुकीदरम्यान पोलीस त्यांना अटक करणार की काय, अशी सर्वत्र चर्चा सुरू होती. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत रात्री उशिरापर्यंत काहीही सांगण्यास नकार दिला. दरम्यान आज सकाळी उदयनराजे सातारा शहर सोडून पुन्हा अज्ञातस्थळी रवाना झाल्याचे समजते. यामुळे पोलीस कारवाईकडे पुन्हा सगळय़ांचे लक्ष लागले आहे. दरम्यान उदयनराजेंना लवकरच अटक करणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. पोलिसांकडून यादृष्टीने काही पावले उचलण्यास सुरुवात केली असून शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे.

कायदा सगळ्यांना सारखा

कोल्हापूर: उदयनराजे यांनी साताऱ्यात मिरवणूक काढल्याबाबत माहिती नसल्याचे गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मात्र मात्र तसे असेल तर दोषींवर कारवाई करण्यात येईल. कायदा सगळ्यासाठी समान असल्याचे त्यांनी सांगितले.