उभयतांना परस्परांची गरज

निवडून येण्याची क्षमता या एकमेव मुद्दय़ावर गेली पाच वर्षे पक्षाशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, सातार जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची ताकद असल्याने उदयनराजे यांनाही घडय़ाळाशिवाय पर्याय नव्हता. परस्परांना उभयतांची गरज असल्याने दोन्ही बाजूंनी तलवारी म्यान करण्यात आल्या आहेत.

उदयनराजे  गेले काही दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करीत होते. त्यांच्या कामाची स्तुती करीत होते. यातूनच अन्य नेत्यांप्रमाणेच उदयनराजे भोसले हे भाजपच्या कमळाचा आधार घेणार, अशी अटकळ बांधली जात होती. २००९ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यावरही उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी काहीच संबंध ठेवले नव्हते. २०१४ मध्येही त्यांना उमेदवारी देण्यास विरोध झाला होता. पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावरच पुन्हा विश्वास व्यक्त केला. गेली पाच वर्षे उदयनराजे तसे  राष्ट्रवादीपासून दूरच होते. सातारा नगरपालिका निवडणुकीत त्यांनी आपले चुलत भाऊ आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्या विरोधात पॅनेल उभे केले होते. जिल्हा परिषदेतही उदयनराजे यांची मदत झाली नव्हती.

सातारा जिल्ह्य़ाच्या राष्ट्रवादीच्या राजकारणात उदयनराजे यांच्या विरोधात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंह भोसले अशी विभागणी झाली होती. उदयनराजे यांनी स्वपक्षीयांचा अपमान करण्यात धन्यता मानली. उदयनराजे आणि विरुद्ध राष्ट्रवादीचे स्थानिक नेते असे चित्र तयार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी स्थानिक पातळीवर केली होती.

साताऱ्यातून उदयनराजेच निवडून येऊ शकतात, हे पवार यांनी हेरले होते. ते भाजपमध्ये गेले असते तर राष्ट्रवादीला हक्काची जागा गमवावी लागली असती. यामुळेच पवार यांनी उदयनराजे आणि जिल्ह्य़ातील नेते यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह या दोन चुलत भावांना सातारा दौऱ्यात गाडीत बरोबर घेतले. यातून वेगळा संदेश गेला होता. उदयनराजे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले तरी भाजपचा पर्याय तेवढा सोपा नाही, हे उदयनराजेंच्याही लक्षात आले होते.

राष्ट्रवादीला उदयनराजे यांच्याशिवाय पर्याय नव्हता. दुसरीकडे राजकीय परिस्थिती लक्षात घेता, उदयनराजे यांनाही राष्ट्रवादीची मदत आवश्यक होती. यामुळेच गेली पाच वर्षे राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडे कधीही न फिरकणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे १३वे वंशज उदयनराजे यांचेच नेतृत्व मान्य करावे लागले.

उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह यांच्यातील विसंवादातून गेली दोन वर्षे अनेकदा उभयतांचे कार्यकर्ते भिडले.  दोन्ही राजे यांना शरद पवार यांनी एकत्र आणले असले तरी उभयतांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन होईल का, हा खरा प्रश्न आहे.

माझ्यातील आणि शिवेंद्रसिंह यांच्यातील कटुता आता संपली आहे.  निवडणुकीसाठी त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना समजवावे लागेल. मलाही माझ्या कार्यकर्त्यांची समजूत घालावी लागेल. सारे एकत्रित काम करू.    – उदयनराजे भोसले, खासदार 

आमच्याकडे शरद पवार यांचा शब्द अंतिम आहे. त्यांच्यापुढे आम्ही कोणी नाही. मी आणि उदयनराजे यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. या निवडणुकीत मला माझ्या कार्यकर्त्यांना समजवावे लागेल. आता उदयनराजेंची निवडणूक आहे. माझ्या निवडणुकीला अजून वेळ आहे. आम्ही सर्वानी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे.      – शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार