वाई : मी आजपर्यंत ज्या ज्या योजना आणल्या, त्याकडे माजी मुख्यमंत्र्यांनी साधे पाहिले देखील नाही. कृष्णा खोरे योजनेतून या भागात वेळीच विकासाची कामे झाली असती, तर आज या भागात ही दुष्काळाची स्थिती निर्माण झाली नसती. या निष्क्रिय अशा रिकाम्या लोकांबरोबर राहिलो, तर भविष्यात लोकच माझ्यासोबत राहणार नाहीत, अशा शब्दांत भाजपच्या वाटेवर असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वकियांनाच टोले लगावले आहेत.

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. यामध्ये पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता उर्वरित काही नेतेही लवकरच पक्षांतर करणार असून त्यामध्ये उदयनराजे यांचे नाव आघाडीवर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर पत्रकारांनी त्यांची भूमिका विचारली असता त्यांनी यावर थेट भाष्य न करता पक्षाला मात्र टोले लगावले आहेत.

उदयनराजे म्हणाले, की माझी प्राधान्यता या भागाच्या विकासाला आहे. मग तो कुठला पक्ष करतो ते माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी या भागाच्या विकासासाठी मदत केलेली आहे. दुसरीकडे यापूर्वीचा अनुभव वेगळा होता. मी या भागाच्या विकासाच्या योजना घेऊन नेतृत्वाकडे जायचो, पण त्याकडे साधे पाहिलेही जात नव्हते.

आज अर्धा सातारा आणि सांगली जिल्ह्य़ात दुष्काळाची स्थिती आहे. कृष्णा खोरे योजनेची कामे जर इथे वेळेत पूर्ण केली असती, तर आज ही दुष्काळाची स्थिती आली नसती. आज पाण्याच्याच या प्रश्नामुळे एक अख्खी पिढी विकासापासून वंचित राहिली. हे पाप कोणाचे आणि ते कसे फेडणार ? आणि पुन्हा तेच राज्यकर्ते मते मागत आहेत, अशा शब्दात उदयनराजेंनी स्वपक्षावरच नाव न घेता टीका केली. उदयनराजेंची इच्छा आहे, तर त्यांनी दिल्लीत जाऊ न त्यांनी भाजप प्रवेश घ्यावा, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले असल्याचे पत्रकारांनी सांगताच उदयनराजे म्हणाले, दादांची काय इच्छा आहे, मी भाजपात येऊ  नये अशी आहे का, असा प्रतिप्रश्न करत ते म्हणाले मला कोणी ‘खो’ घालू शकत नाही. घातला तर मीच ‘खो’ घालू शकतो. तेव्हा कोणीही त्या विचारात न असलेले बरे. मी सकारात्मक विचार करतो.