वाई(वार्ताहर): साताऱ्यातील जुना मोटार स्टँड येथे असलेला दारूचा अड्डा हटवण्यावरून दोन्ही राजे पुन्हा एकमेकांसमोर आल्याने सोमवारी शहरात तणाव निर्माण झाला. या वेळी पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यावर त्यांनी माघार घेतली. मात्र या वेळी जमलेल्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना व बघ्यांना पोलिसांच्या लाठीमाराला सामोरे जावे लागले.

शहरातील एक देशी दारूचे दुकान काढण्यासाठी नगर पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक आले होते. हे दुकान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचे आहे. पालिकेत सत्ता असल्याने पथकामागे खासदार उदयनराजे भोसलेही तिथे पोहोचले. दुकान हटवण्याच्या भूमिकेवर उदयनराजे ठाम होते. मतदारसंघात असलेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना ही माहिती मिळताच तेही या ठिकाणी कार्यकर्त्यांसह हजर झाले. तो पर्यंत या ठिकाणी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते व बघ्यांनी गर्दी केली. दोन्ही राजांनी आक्रमक भूमिका घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. हे दुकान पाडण्याचा आदेश आहे का, असा सवाल शिवेंद्रसिंहराजेंनी नगरपालिकेच्या पथकाला विचारला. तर खा. उदयनराजे यांनी हे दुकान पाडाच अशी भूमिका घेतली. दोन्ही राजांच्या भूमिकेने तणाव वाढत असतानाच दोन्ही गटांचे कार्यकर्ते दाखल झाल्यामुळे तणावात भर पडली.

दरम्यान या ठिकाणी पोलीसही दाखल झाले. पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी कायदा हातात घेऊ नका आणि मला कारवाई करण्यास भाग पडू नका, असे सांगितल्यावर दोन्ही गटांनी माघार घेतली. मात्र शिवेंद्रसिंहराजे अगोदर खा. उदयनराजेना जायला सांगा मग मी जातो, या भूमिकेवर ठाम राहिले. पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी दोघांशी चर्चा केली आणि शेवटी दोन्हीही राजे दोन बाजूला निघून गेले. त्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊन वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी या वेळी गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांना व बघ्यांना किरकोळ लाठीमार करत पिटाळून लावले.