साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यातली शाब्दिक चकमक वाढतानाच दिसते आहे. साताऱ्यात या दोघांच्या वादाची पेटती भट्टीच सुरु झाली आहे. मी लोकांची कामे करतो म्हणून कॉलर उडवतो असे म्हणत उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. अशात शिवेंद्र राजे यांनी पुन्हा एकदा उदयनराजेंना लक्ष्य केले आहे. मी जर खलनायक असेन तर उदयनराजे हे राजकारणातले प्रेम चोप्रा आहेत त्यांना उत्तर द्यायला मी काही अमोल पालेकर नाही असे शिवेंद्र राजे यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर कॉलर उडवायला काही अक्कल लागत नाही कॉलर प्रत्येकाच्या शर्टला असते असाही टोला शिवेंद्रराजे यांनी लगावला.

टीका करायला मुद्दे नसले तर लोक वैयक्तिक पातळीवर येतात. मला खलनायकाची भूमिका घ्यावी लागली कारण उदयनराजेंचे राजकारण प्रेम चोपडाचे राजकारण आहे. लोक चर्चेत राहण्यासाठी काहीही बोलतात. ते रविवारी म्हटले एक खुडूक कोबंडी आहे. खासदारांना कोबंड्या खुडूक आहेत की अंड्याला आल्या आहेत हे तपासण्याचे ट्रेनिंक कोणी दिले? असाही खोचक प्रश्न शिवेंद्र राजे यांनी उपस्थित केला आहे. मला लोकांची कामे करण्यात रस आहे. मी उगाच लोकांसमोर जाऊन प्रतिज्ञा करत नाही की तुमचे हे काम झाले नाही तर मिशी काढेन, नाहीतर भुवया काढेन. मला असल्या डायलॉगबाजीची गरज लागत नाही. यांनी आजवर कोणती कामे केली ती जरा सांगावीत.

खासदार समोरासमोर येण्याची भाषा करतात. मग माझ्या घरावर चाल करून आले होते तेव्हा पळपुटेपणा का दाखवला? आम्ही समोर आलो होतो. खासदारच त्यावेळी पळून गेले असेही शिवेंद्र राजेंनी म्हटले आहे.

उदयनराजे यांनी काय म्हटले होते?
मी लोकांची कामे करतो म्हणून कॉलर उडवतो. आमदार खासदार कोणीही होऊ शकतो त्यानंतर लोकांची कामे करावी लागतात. उदयनराजेंच्या ओठात एक पोटात एक असे नसते. तुम्ही कामे करत नाही फक्त घोषणा करता, ही असली फाल्तुगिरी करू नका. दुसऱ्यावर चिखलफेक करायला अक्कल लागत नाही. लोकांची कामे करायची इच्छा असेल तर अक्कल लागते. शिवेंद्र राजेंचे विचार संकुचित आहेत असे उदयनराजेंनी म्हटले होते. या सगळ्या टिकेला सोमवारी शिवेंद्र राजेंनी उत्तर दिले.