News Flash

भाजपा प्रवेशाबाबत उदयनराजे करणार फेरविचार?

उदयनराजे राष्ट्रवादी सोडणार नाहीत अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहेत

उदयनराजे भोसले

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाण्यास विरोध केल्याने खासदार उदयनराजे भोसले आहेत तिथेच थांबतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच उदयनराजे भोसले राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात जातील या चर्चांना यू-टर्न मिळाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.  पुण्यात भाजपा प्रवेशासाठी घेतलेली बैठक स्थगित करण्यात आली. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उदयनराजेंच्या प्रवेशाला खो घातला होता यामुळेही उदयनराजेंचा भाजपा प्रवेश लांबणीवर पडला आहे.

उदयनराजेंचा भाजपा प्रवेश हा गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय आहे. त्यावरून विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. उदयनराजेंनी भाजपात जाऊ नये यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याचं समजतं आहे. एवढंच नाही तर खासदार डॉ. अमोल कोल्हे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उदयनराजेंची भेट घेत त्यांना राष्ट्रवादी सोडू नका अशी विनंती केली होती. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंनी आज पुण्यात काही कार्यकर्त्यांची भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीतच राहायचं यासाठी एका हॉटेलमध्ये बैठक बोलावली होती. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पुण्यात हजर झाले होते.अचानक ही बैठक रद्द करण्यात आली. यामुळे उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने नवे वळण घेतले आहे. या बैठकीनंतर उदयनराजे हे भाजप प्रवेशावर यू-टर्न घेत राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘आहे तिथंच उत्तम आहे. भाजपात जाणं धोक्याचं ठरू शकतं’ असं म्हणत जवळच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीतच राहण्याचा आग्रह केला.यावेळी मात्र उदयनराजेंनी कार्यकर्त्यांचे म्हणणे गंभीरपणे ऐकले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपल्याविरुद्ध टोकाचा प्रचार करत निवडणुकीत पराजय होईल अशी व्यूहरचना करत प्रचार केला होता. खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपाच्या तिकीटावर पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरे जाण्यात काही कार्यकर्त्यांना ” रिस्क ‘ वाटत असल्याने हे कार्यकर्ते राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे उदयनराजे संभ्रमात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे उदयनराजेंनीही भाजपा प्रवेशाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली असून ते राष्ट्रवादीतच राहतील, अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.

उदयनराजेच्या भाजपा प्रवेशाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खो घातला. उदयनराजे भाजपामध्ये आले तर पश्चिम महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटलांचे भाजपामधले वर्चस्व कमी होईल, अशी चर्चा भाजपामध्ये होती. शिवाय उदयनराजेंच्या नावामागे ग्लॅमर असल्याने चंद्रकांत पाटलांचे पक्षातील स्थान कमी होईल अशा शक्यता असल्याने त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपाने उदयनराजेंना आणखी दोन दिवस थांबण्यास सांगितल्याचीही चर्चा आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 8:27 pm

Web Title: udayanraje bhosle is may not join the bjp says sources scj 81
Next Stories
1 शिवकालीन सज्जनगड, अजिंक्यतारा, जंजीरा असंरक्षित; या किल्ल्यांचे काय होणार?
2 नाशिक महापालिकेच्या महासभेत पाणी प्रश्न पेटला, विरोधकांचा राडा
3 एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेच अमेरिकेची मोहिम यशस्वी-संभाजी भिडे
Just Now!
X