साताऱ्यातील जुना मोटर स्टँड परिसरातील गुन्ह्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह पंचवीस समर्थकाना या दोन गुन्ह्यांत जामीन मिळाला आहे. खासदार उदयनराजे न्यायालयात हजर झाल्याने पोलिसांची ताराबंळ झाली. दरम्यान दुपारी त्यांच्यासह २५ जणांना या दोन गुन्ह्यांत जामीन मिळाला आहे. बुधवारी दोन्ही गटातील १७ समर्थकांना न्यायालयाने जमीन मंजूर केला होता .

सोमवारी दुपारी जुना मोटर स्टँड येथे दारूच्या दुकानासमोर खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे भोसले दोघे कार्यकर्त्यांसह समोरासमोर आले होते. यावेळी दोन्ही बाजूचे त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्याने वातावरण तंग झाले. एका वर्षापूर्वी सुरुची राड्याची पुनरावृत्ती होते की काय असेच वातावरण निर्माण झाल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.

या सर्व प्रकारची पोलिसांनी गंभीर दखल घेत स्वतः एक तक्रार दिली तसेच आ. शिवेंद्रराजे भोसले समर्थकानेही एक तक्रार दिली. त्याचमुळे या प्रकरणात उदयनराजेंवर एकूण दोन गुन्हे दाखल झाले होते.साताऱ्यात जिल्हा दंडाधिकारी यांचा जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश लागू असताना संशयितांनी बेकायदा जमाव जमवून एकत्र आले. तसेच रवी ढोणे यांना जीवे मारण्याची धमकी असे दोन गुन्हे खा. उदयनराजे भोसले यांच्यावर दाखल आहेत. या दोन्ही गुन्हांसाठी आज गुरुवारी दुपारी ते न्यायालयात हजर राहिले. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. दरम्यान, न्यायालयात यावेळी मोठी गर्दी झाल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता