उदयनराजे हे मित्रांचे मित्र, प्रेमाला प्रेम देणारी व्यक्ती आणि अन्यायाविरुद्ध कोणतीही पर्वा न करता आवाज उठवणारी व्यक्ती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते खासदार उदयनराजे भोसले यांच्या ५१व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र पाठ फिरवली. या सर्वांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. दरम्यान, त्यांच्या जीवनावर एक चित्रफित दाखवण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत मात्र, राज्याच्या राजकारणातील मुक्त विद्यापीठ आहेत. जे उदयनराजेंच्या नियमांचे पालन करीत नाहीत, त्यांना ते शासन करतात, अशी टिप्पणीही यावेळी त्यांनी केली. उदयनराजे हे मित्रांचा मित्र, प्रेमाला प्रेम देणारा आणि अन्यायाविरुद्ध कोणतीही पर्वा न करता आवाज उठवणारी व्यक्ती आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंचे कौतुक केले.

फडणवीस म्हणाले, उदयनराजेंवर आम्ही छत्रपतींचे वंशज म्हणून प्रेम करतो. उदयनराजे आणि माझी अनेकदा भेट होते. मात्र, प्रत्येकवेळी ते साताऱ्यासाठीच काहीतरी मागतात. उदयनराजेंनी केलेली साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणाची आणि जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीला त्यांनी यावेळी जाहीर मान्यता दिली.