साता-याच्या रणांगणात विरोधकांची कामगिरी अतिशय निराशाजनक ठरून उदयनराजेंविरोधातील सर्व सतराही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. महायुतीने उमेदवारी देताना घातलेला सावळा गोंधळ, युती नेत्यांकडून उदयनराजेंना मिळालेली क्लिन चिट, उमेदवारांची जंत्री अन, विरोधात सक्षम उमेदवार नसल्याची पुण्याई फळास जाऊन उदयनराजेंनी नेत्रदीपक विजय संपादन केला. दरम्यान, उदयनराजे जिंकले असले तरी सत्ता गेल्याने आघाडीत फारसे समाधानाचे वातावरण नसून, दुसरीकडे राज्यात, देशात घवघवीत यश मिळाल्याने युतीमध्ये मात्र उत्साह दिसून येत आहे.  
लोकसभेच्या एकंदरच निकालाचा कौल फोल ठरवत सातारा लोकसभेच्या मतदारांनी दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या या मतदारसंघाची, तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रतिष्ठेची बूज राखत काँग्रेस आघाडीचे उमेदवार उदयनराजेंना प्रतिकूल परिस्थितीत ३ लाख ४४ हजार ७२५ इतके विक्रमी मताधिक्य दिले. गत निवडणुकीत उदयनराजेंसह पाच उमेदवार रिंगणात असताना, ते २ लाख ९७ हजारांवर मताधिक्याने विजयी झाले होते. सध्याचे त्यांचे प्रतिस्पर्धी त्यावेळचे सेनेचे उमेदवार पुरूषोत्तम जाधव यांना २ लाख ३५ हजार मते मिळाली होती. या वेळी महायुतीने ही जागा रिपाईंला सोडल्याने जाधवांची महायुतीकडील उमेदवारी हुकली. मात्र, त्यांची या खेपेस अपक्ष म्हणून उमेदवारी राहिली परंतु, त्यांची कामगिरी प्रभावी ठरू शकली नाही. उदयनराजेंनी ५ लाख २२ हजारांवर म्हणजेच एकूण मतदानाच्या ५४ टक्क्यांहून अधिक मते घेतली. तर, दुस-या क्रमांकावरील पुरूषोत्तम जाधवांना १ लाख ५६ हजार मतांवर समाधान मानत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. महायुतीचे अशोक गायकवाड ७२ हजार मतांचे मानकरी रहात चौथ्या स्थानावर फेकले गेले. तर, ‘आप’च्या राजेंद्र चोरगेंनी ८२ हजार मते घेत महायुतीपेक्षा चांगली कामगिरी दाखवून दिली. मतदान केंद्रनिहाय मतदान जाहीर होणार असल्याने आघाडीच्या सर्वच नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उद्याच्या आढाव्यात मतदानाचा लेखाजोखा गांभीर्याने घेऊन सतर्कतेने मतदान केल्यानेच राजेंचा विजय उच्चांकी ठरला. देशात मोदी लाटेने काँग्रेस आघाडीची नाचक्की झाली असताना, बालेकिल्ल्यातील जनतेने येथे मात्र, आघाडीची बिघाडी होऊ न देता शरद पवार व पृथ्वीराज चव्हाणांबरोबरच उदयनराजेंचे नेतृत्व सार्थ ठरवल्याचे म्हणावे लागेल.