साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले सलग तिसऱ्यांदा मताधिक्याने जिंकले आहेत. त्यांचा जवळपास सव्वालाख मताधिक्याने विजय झाला आहे. विजय निश्चित होताच राजे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. मात्र उदयनराजे यांनी हा विजय नोंदवतानाच मागील वेळीपेक्षा त्यांच्या मताधिक्यात झालेली घट यंदाच्या चर्चेचा केंद्रबिंदू होती.

सातारा येथे आज गुरुवारी सकाळपासून मतमोजणीस सुरुवात झाली. सातारच्या निवडणूक निकालावर प्रारंभीपासून लोकांच्या नजरा खिळल्या होत्या. दूरचित्रवाहिन्यांसमोर ताजी खबरबात घेताना, भ्रमणध्वनीवरही चालू घडामोडी पहाण्यासाठी लोक आतुर दिसून आले. मात्र, प्रशासनाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत इव्हीएमवरील संपूर्ण मतमोजणी पूर्ण होऊन निकालाचे चित्र स्पष्ट होईल असा दिलेला विश्वास मात्र फोल ठरला. सायंकाळी उशिरापर्यंत इव्हीएमवरील नेमकी व अंतिम आकडेवारी अधिकृतपणे जाहीर झाली नव्हती. मात्र, उदयनराजेंचा सुमारे सव्वा लाखांहून अधिक मताधिक्याने विजय निश्चित असल्याचे चित्र समोर आले होते.

शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि माढय़ाच्या हुकमी मतदारसंघात मोठय़ा फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना अपयश आले असताना सातारा मतदारसंघातून मात्र, राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले अपवाद वगळता सतत मताधिक्य घेत विजयी झाले.