विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नागपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. विदर्भात पक्षाच्या संघटनात्मकदृष्टय़ा बांधणीसाठी ते लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.
उद्धव ठाकरे १४ डिसेंबरला नागपूर भेटीवर येणार आहेत. विदर्भातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठक घेऊन त्यांच्याशी विदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांचा जाहीर कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त विदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे राष्ट्रीय नेते नागपुरात येतात आणि विधिमंडळाला भेट देऊन लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतात. शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उद्या, सोमवारपासून राज्यातील विविध भागात दौरे करणार आहेत. १० डिसेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार असून सिंचन घोटाळ्यासह विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, धान आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर मुद्यांवर चर्चा होणार आहे. विदर्भातील पक्ष संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत. १४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे विधिमंडळाला भेट देणार आहेत.  त्यानंतर दुपारी १ वाजता राजभवनजवळील बालसदन सभागृहात प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या मेळाव्याला ते संबोधित करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी दिली. यावेळी खासदार संजय राऊत, गजानन कीर्तीकर यांच्यासह शिवेसनेचे काही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बाधण्यासंदर्भातची मागणी जोर धरणार आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी विधिमंडळाला भेट देऊन लोकप्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. या वर्षीसुद्धा ते अधिवेशनादरम्यान एक दिवस विदर्भात येणार असल्याची माहिती मिळाली असली तरी त्या संदर्भात कुठलाही निश्चित असा जाहीर कार्यक्रम आलेला नसल्याचे मनसेचे विदर्भ विभागीय संघटक हेमंत गडकरी यांनी सांगितले.
 राज ठाकरे यांचा विदर्भाचा कार्यक्रम अजूनपर्यंत निश्चित झालेला नाही. विदर्भात पक्षाची संघटनात्मकदृष्टय़ा बांधणी आणि विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे आमदार विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत जाऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या त्या जिल्ह्य़ातील समस्या जाणून घेणार आहेत, असेही  गडकरी यांनी सांगितले.