सीमेवर भारतीय जवान शत्रूचा सामना करत असतात. ते सीमेवर दक्ष असल्यामुळेच सामान्य नागरिक शांत झोपू शकतात. बुलडाण्यातील एका तरूणाने याच भावनेतून जवानांचा सन्मान करण्यासाठी एक वेगळी शक्कल लढवली आणि त्याने चांदीच्या वस्तऱ्याने जवानांची नि:शूल्क दाढी करण्याचा निर्णय घेतला. उद्धव गाडेकर असे या तरूणाचे नाव असून तो बुलडाण्यातील केळवद गावात राहतो. त्याचे गावात एक केश कर्तनालय (सलून) आहे. जवानांना योग्य सन्मान मिळावा म्हणून उद्धव यांनी सैनिकांसाठी मोफत दाढी-कटींग करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.

सुटीसाठी आपल्या गावी परतलेल्या जवानांची उद्धव हे नि:शूल्क दाढी करतात आणि विशेष म्हणजे यासाठी ते खास चांदीचा वस्तरा वापरतात. ते ही सेवा माजी सैनिकांनाही देतात. याबाबत उद्धव म्हणाले की, सीमेवर तैनात सैनिकांमुळेच आम्ही सुरक्षित आणि शांततेत आपले जीवन व्यतीत करतो. जवानांचा सन्मान करण्यासाठी मी ही अनोखी सुरूवात केली. या माध्यमातून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांची मला सेवा करता येईल, हाच माझा उद्धेश आहे. चांदीच्या वस्तऱ्याने दाढी केल्यामुळे सैनिकांनाही चांगले वाटते. एका न्हावीकडून जवानाचा यापेक्षा चांगला सन्मान होऊ शकत नाही.

अनोख्या अभियानाची सुरूवात करण्याची उद्धव यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ते ‘बेटी बचाओ’ अभियानाला मदत करताना फक्त एक मुलगी असलेल्या वडिलांना नि:शूल्क दाढी करण्याची सुविधा देत असत.