18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

उद्धव यांनी पहिली फेरी जिंकली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोकणात सुरू झालेल्या सुप्त राजकीय

खास प्रतिनिधी रत्नागिरी | Updated: December 8, 2012 5:57 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोकणात सुरू झालेल्या सुप्त राजकीय स्पर्धेत आज कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन करत पहिली फेरी जिंकली.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनामुळे शिवसेनेच्या भावी वाटचालीबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. खुद्द उद्धव यांनीही त्याचा निसटता उल्लेख केला. कोकणाशी सेनेची पूर्वीपासून नाळ जोडलेली असली तरी गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्य़ात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसने सेनेला शह दिला आहे. राणेंपाठोपाठ सेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रत्नागिरी जिल्ह्य़ातील खेड तालुक्यात बस्तान बसवले आहे. या पडझडीच्या आणि बाळासाहेबांच्या निधनाच्या पाश्र्वभूमीवर उद्धव यांच्या उपस्थितीत कोकणातील तिन्ही जिल्ह्य़ांमधील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या पूर्वी कोल्हापूर आणि नाशिक येथेही अशा स्वरूपाचे मेळावे झाले. तेथे केलेल्या भाषणाचीच उद्धव यांनी आज पुनरावृत्ती केली. पण मेळाव्याला झालेली शिवसैनिकांची गर्दी आणि उद्धव यांच्या भाषणात दिल्या जाणाऱ्या घोषणा लक्षात घेता, बाळासाहेबांनंतर सुरू झालेल्या सुप्त राजकीय स्पध्रेची पहिली फेरी तरी त्यांनी जिंकली, असे म्हणता येईल. मात्र आपण आज राजकीय भाषण करणार नाही, असे सुरवातीलाच स्पष्ट करत त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी भावनिक संवाद साधला.  शिवसेनाप्रमुखांनी निर्माण केलेली ताकद वाया जाऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करतानाच त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि खासदार अनंत गीते यांनीही मनोगत व्यक्त केले.

First Published on December 8, 2012 5:57 am

Web Title: uddhav has won first round