सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर विधानांमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी वादग्रस्त विधानं केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही एकेरी भाषेत टीका केली होती. या संपूर्ण वादावरून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुलाखत घेतली. राऊत यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाबद्दलही प्रश्न विचारला. “दुसरा मुद्दा म्हणजे ती एक अभिनेत्री आहे. मुंबईची बदनामी त्या अभिनेत्रीकडून झाली…” असं राऊत म्हणाले. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले,”ते सोडून द्या, त्यावर मला काही बोलायचं नाही, त्यावर बोलायला मला वेळही नाही. हा मुंबईकरांचा अपमान आहे आणि अशा तिने वर्णन केलेल्या मुंबईवर तुम्ही भगवा फडकवणार आहात? तोही म्हणे शुद्ध. सोडून द्या,” अशा शब्दात ठाकरेंनी उत्तर दिलं.

“तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशी ओरड झालीये यानिमित्ताने की, महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं लादली. महाराष्ट्रात आणीबाणीसदृश परिस्थिती आहे. एका टीव्ही अँकरच्या निमित्ताने हे सगळे विषय निर्माण झाले…” असा मुद्दा उपस्थित केला.

आणखी वाचा- हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

मुख्यमंत्री म्हणाले, “पुण्यप्रसून वाजपेयी हे पत्रकार होते. सध्या कुठे असतात ते? त्यांच्यासुद्धा स्वातंत्र्यावर हल्ला करून त्यांना बाहेर काढले असे मला वाटते…अशी खूप मोठी यादी मध्यंतरी आली होती, त्याचा आधी अंदाज घेऊ आपण. त्याच्यामागे यंत्रणा लावा आणि ती लोपं कुठे गेली… कहां गये वो लोग? त्या सगळ्यामागे सीबीआय लावा.. या पत्रकारांवर का हल्ले झाले.. त्यांच्या नोकऱया कोणी घालवल्या? त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर.. आणि ते हल्ले कुणी केले? आणि त्यांचे तुम्ही काय काय केलेत? कसे केलेत? लावा त्यांच्यामागे सीबीआय,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी ईडी, सीबीआयच्या राजकारणावरून टीका केली.

आणखी वाचा- …पण डोक्याचे विकार त्यात घ्यायचे राहिले; उद्धव ठाकरेंचं भाजपाला प्रत्युत्तर

अन्वय नाईक प्रकरणावर बोलताना ठाकरे म्हणाले, “हे संतापजनक आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाने उभंच राहायचं नाही काय? उद्योगधंदे करायचे नाहीत काय? उपरे येणार, त्याला फसवणार, त्याच्या छाताडावर नाचणार आणि या दुष्कृत्यांमुळे जर का त्याने आत्महत्या केली… आणि आत्महत्या करताना त्याने जे टिपण केलं, त्यात ज्यांची नावं आहेत, त्यांची चौकशी करायची नाही… ती दाबून टाकायची… आणि पुन्हा वर काढली तर त्याच्यासाठी बोलणाऱयांच्या मागे तुम्ही ईडी लावायची.. म्हणजे मराठी माणसाला महाराष्ट्रात गाडून त्याच्यावर तुम्ही नाचणार? आणि ते आम्ही सहन करू उघडय़ा डोळय़ांनी? हे होणार नाही,” असं ठाकरे म्हणाले.