आगामी निवडणुकांच्या काळात मनसेला महायुतीमध्ये घ्यायचे की नाही, याबद्दल तर्क-कुतर्क सुरू असतानाच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीच अंतिम निर्णय घ्यावा, अशी जाहीर सूचना भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी बुधवारी येथे केली. एकत्र येण्यासाठी या दोघांनी पुढाकार घेतल्याशिवाय काहीही साध्य होणार नाही, असेही ते म्हणाले.
काँग्रेस आघाडी शासनकर्त्यांना सुबुद्धी यावी यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंडे यांच्या या सूचनेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेस उधाण आले आहे. ‘महायुती’त मनसेच्या प्रवेशासंबंधी मुंडे हे पहिल्यापासून कमालीचे आग्रही असून त्यांनी तसे प्रयत्नही केले होते. उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र आल्याशिवाय राज्यात युतीची सत्ता येऊ शकत नाही, या मुद्दय़ावर मुंडे ठाम असून ठाकरेबंधूंना त्यांनी तसे जाहीर आवाहनही केले होते. मात्र, कऱ्हाड येथे आता मुंडे यांनी उपरोक्त भूमिका मांडल्यामुळे पुन्हा एकदा विविध तर्क लढविले जात आहेत.
दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच आयपीएल ही स्पर्धा सुरू झाली आणि तेव्हापासूनच ही स्पर्धा कोणत्या ना कोणत्या भ्रष्टाचारामुळे वादग्रस्त ठरली आहे, या शब्दांत मुंडे यांनी पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली.