आमचे तरुण लष्करी जवान जम्मू-कश्मीरमध्ये रोज मरत आहेत. या जवानांची छाती किती इंचांची ते माहीत नाही, पण ते कोणतेही रडगाणे न गाता लढत आहेत. काँग्रेसचे राज्य असतानाही लढत होते व आता मोदींचे राज्य आले तरीही त्यांची लढाई व हौतात्म्य संपलेले नाही. चौकीदाराने याची दखल घेतली पाहिजे असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केलं आहे. राज्यकर्त्यांनी शहीद मेजर शशीधरन नायर यांच्या घरी जाऊन त्यांची माता, पत्नी व बहिणीचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. रडगाणे व आक्रोश यातला फरक जेव्हा कळेल तो सुदिन. मेजर शशीधरन माफ करा, जवानांचे बलिदान तसे व्यर्थच जात आहे अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

जम्मू-कश्मीरात हिंदुस्थानी जवानांचे बलिदान सुरूच आहे. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी दोन भयंकर स्फोट घडवले. त्यात मेजर शशीधरन नायर यांनी हौतात्म्य पत्करले आहे. याच हल्ल्यात आणखी एका जवानास वीरगती प्राप्त झाली.

जम्मू-कश्मीरमध्ये आपण आजपर्यंत देशाचे अनेक तरुण सुपुत्र गमावले व गमवत आहोत. त्यानंतर शोक व्यक्त करणे, अश्रू ढाळणे व बदला घेण्याच्या पोकळ वल्गना करणे यापेक्षा अनेक वर्षांत काय घडले? गेल्या एक-दीड वर्षांत सुरक्षा दलांनी जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम चालवली आहे. शनिवारी मध्यरात्रीही जम्मू-कश्मीरच्या कुलगाम भागात सुरक्षा दलांनी ‘वॉण्टेड’ दहशतवादी झीनत उल इस्लाम याचा त्याच्या एका साथीदारासह खात्मा केला. मात्र त्यामुळे ना दहशतवादी कारवाया थांबल्या आहेत ना आमच्या जवानांचे शहीद होणे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शुक्रवारी पाकिस्तानच्या सैन्याने सुंदरबनी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचा भंग करून बेछूट गोळीबार केला. याचदरम्यान रूपमती आणि पुखराणी या दोन ठिकाणी स्फोट झाले. दोन्ही स्फोट पाकड्या दहशतवाद्यांनी घडवले. हिंदुस्थानी लष्कराने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र त्यात अवघ्या 33 वर्षांचे मेजर शशीधरन व आणखी एका जवानाला देशासाठी प्राणत्याग करावा लागला. मेजर शशीधरन व त्यांचे वीर साथी सीमेवर पाकड्यांशी लढत होते तेव्हा आमचे राज्यकर्ते म्हणवून घेणारे काय करीत होते? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

रामलीला मैदानावर सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींसह बरेच मंत्री-मुख्यमंत्री हजर होते व 2019 साली पुन्हा मजबूत सरकार आणण्याचे भाषण ठोकीत होते. याचा अर्थ काय घ्यायचा? 2014 साली संपूर्ण बहुमताचे सरकार मोदींनी स्थापन केले ते मजबूत नव्हते काय? ते ‘पोकळ’ होते काय? असे साडेचार वर्षांनंतर सांगणे हा मतदारांनी दिलेल्या बहुमताचा अपमान आहे. 2014 मध्ये तुम्हाला जनतेने पूर्ण बहुमताचे सरकार दिले, मात्र याच चार वर्षांच्या काळात कश्मीर खोऱ्यातील स्थिती जास्त चिघळली व रक्ताचे पाट वाहिले. त्यात आमच्या जवानांचे रक्त आणि बलिदान सगळ्यात जास्त होते. राममंदिर, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी हटवणे वगैरे प्रचाराचे विषय होतेच, पण ‘56 इंच छाती’चा हवाला देऊन मोदी यांनी मोठी वक्तव्ये केली ती कश्मीरातील रक्तपात, दहशतवाद संपवण्यासाठी याची आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.

काँगेस पुचाट म्हणून कश्मीरचा प्रश्न सुटला नाही असे जम्मू-श्रीनगरच्या भाषणात सांगण्यात आले, पण काल मेजर शशीधरन यांच्या बलिदानानंतर पुन्हा कश्मीरातील रक्तपाताचा प्रश्न उभा राहिला. श्री. मोदी यांनी रामलीलावरील भाषणात सांगितले की, ‘‘काँग्रेसने मला छळले!’’ स्वतःचे दुखणे बाजूला ठेवून देशाचे दुखणे दूर करतो तो राज्यकर्ता. पाकिस्तान छळत आहे व त्या छळात आमच्या जवानांचे बलिदान होत आहे ते आधी बघा. ‘‘चौकीदार एकालाही सोडणार नाही!’’ असेही पंतप्रधान म्हणतात. बरोबर आहे, एकालाही सोडू नका. त्याआधी पाकिस्तानला सोडू नका असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.