औरंगाबादच्या कचरा प्रश्नी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादकरांची माफी मागितली आहे. कचरा प्रश्न न सुटल्याने नागरिकांना जो काही त्रास सहन करावा लागला त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. स्वबळावर लोकसभा निवडणुका लढवण्याची घोषणा याआधीच उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरे ८ लोकसभा मतदार संघांचा आढावा घेत आहेत. अशात त्यांनी औरंगाबादकरांची माफी मागितली आहे.

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सलग पाचवेळा लोकसभा मतदार संघातून निवडून येण्याची किमया खासदार चंद्रकांत खैरे यांनी घडवली. अशात या शहरातला कचरा प्रश्न अजूनही पेटलेला आहे. नारेगावमध्ये २० लाख टन कचऱ्याचा डोंगर साठत गेला. अशात उद्धव ठाकरे या प्रश्नी काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे होते. अशात उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादकरांची माफी मागत आणि दिलगिरी व्यक्त केली आहे.

औरंगाबाद शहराला कचराकोंडी सोडवण्याची जबाबदारी प्रभारी आयुक्त आणि नवल किशोर राम यांची बदली झाली आहे. त्यामुळे शहर वाऱ्यावर सोडले आहे का? असाच प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसापूर्वीच त्यांची बदली झाली. आता नवे अधिकारी येऊन पुन्हा कचराकोंडीचा अभ्यास करणार, म्हणजे पुन्हा वेळ जाणार त्यामुळे या बदलीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त झाली. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही शहरातला प्रश्न सुटलेला नाही. आता उद्धव ठाकरेंच्या माफीबाबत औरंगाबादकर काय प्रतिक्रिया देणार ते पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.