मसूद अजहरला युनोमध्ये दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या हिंदुस्थानच्या प्रयत्नांना खोडा घालून चिनी अजगराने त्याचे खरे स्वरूप पुन्हा दाखवले. त्यामुळे पाकिस्तानला बळ मिळेल. मसूद अजहर हा एक मोहरा आहे. तो सहज हाती मिळणार नाही. पाकिस्तानला श्वास घ्यायला वेळ मिळाला आहे व चीन त्यांना प्राणवायू देत आहे. जग आमच्या पाठीशी आहे. पण तरीही पाठीत वार होण्याचे थांबत नाही. देशातील सर्वच राजकारण्यांनी बोलघेवडेपणा थांबवायला हवा आणि कृतीसाठी सरकारला पाठिंबा द्यायला हवा. हे केले तरी बरेच साध्य होईल असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.

जैश-ए-मोहम्मदचा टोळीप्रमुख मसूद अजहरच्या पाठीशी चीन खंबीरपणे उभा राहिला आहे. हिंदुस्थानच्या कूटनीतीस हा सगळ्यात मोठा हादरा आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव युनोत म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघात फेटाळण्यात आला. प्रस्ताव फ्रान्सने आणला व चीनने आपल्या व्हेटोचा वापर करून फेटाळून लावला. चीन असे का वागला याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. चीन हा पाकिस्तानचा पाठीराखा आहे व राहणार. हिंदुस्थानचा खरा शत्रू पाकिस्तान नसून चीन आहे. चीनच्या पाठिंब्यावर पाकिस्तानचे शेपूट वळवळत आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पाकिस्तानला जगात एकटे पाडल्याचा डंका आपण कितीही वाजवला तरी ते खरे नाही. दहशतवाद आणि मसूद अजहरच्या विरोधात प्रस्ताव आणून फ्रान्स राफेलच्या खाल्ल्या मिठाला जागला व त्याला तसे करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अमेरिका, युरोपातील अनेक मित्र म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रांनी ‘पुलवामा’ दहशतवादी हल्ल्याचा धिक्कार केला व हिंदुस्थानच्या बाबतीत संवेदना व्यक्त केल्या. पण यापैकी एकाही राष्ट्राने कश्मीरबाबत हिंदुस्थानची ठाम बाजू घेतली असे दिसत नाही अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

दोन राष्ट्रांनी हा प्रश्न चर्चेतून सोडवावा व पाकिस्तानने आपली भूमी दहशतवादासाठी वापरायला देऊ नये, असे सांगून वेळ मारून नेणे म्हणजे पाठिंबा नाही. हिंदुस्थानचा वैमानिक अभिनंदन हा पाकच्या ताब्यात होता व त्याला सोडून देण्याबाबत इम्रान खान यांनी शांतिदूताची भूमिका बजावली. मग ती भीती असेल अथवा शरणागती, पण जिनिव्हा करारानुसार युद्धकैद्यास सोडावे लागणारच होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या ‘गूड न्यूज’चे संकेत आदल्या दिवशी दिले होते ती गूड न्यूज अद्याप गुलदस्त्यात आहे. मसूद अजहरला ‘जिंदा या मुर्दा’ पकडण्यासाठी अमेरिकेचे कमांडो पथक हाजीर आहे असे ते म्हणाले असते तर ती गूड न्यूज ठरली असती. तसे काही झाले काय? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

मसूद अजहर जिवंत आहे व त्यास जेरबंद करून खतम करण्याच्या योजना बारगळल्या आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर आणि हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यानंतर चीनची भूमिका ‘तटस्थ’ होती. त्याचा अर्थ आपल्या कूटनीतीकारांनी असा घेतला की, चीनही आता पाकिस्तानच्या पाठीशी उभा नाही. पण चीनची तटस्थता आणि सोयीचे मौन हे घातक असते हे ‘युनो’तील सुरक्षा परिषदेत पुन्हा एकदा दिसून आले. चीनने ज्या प्रकारे युनोच्या सुरक्षा परिषदेत मसूद अजहरचा बचाव केला व एक प्रकारे पाकिस्तानला पाठिंबा दिला तो सर्वच प्रकार किळसवाणा, तितकाच निर्घृण आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड व युरोपातील इतर राष्ट्रे एका बाजूला व अजहर मसूदच्या बाबतीत चीन दुसऱ्या बाजूला हे आतापर्यंत युनोत तीन वेळा घडले. मसूद हा चीनच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दहशतवादी नाही. मग त्यास चीन ‘संत’ म्हणून मान्यता देणार आहे काय? पाकिस्तान चीनचा मित्र आहे तो स्वार्थापोटी. नेपाळ, पाकसारख्या राष्ट्रांना मांडलिक करून त्यांच्या जमिनीवर कब्जा करणे हे चिन्यांचे ध्येय आहे. अमेरिकेला धक्का देण्यासाठी व त्यातून हिंदुस्थानला अशांत, अस्थिर ठेवण्यासाठी चीन पाकला मदत करीत आहे. चीनचे पंतप्रधान अहमदाबादला येतात. मोदींबरोबर झोपाळ्यावर बसतात. साबरमती आश्रमात जाऊन सतरंजीवर बसतात याचे आपण कौतुक करतो. पण चीनचे अंतरंग उलट्या काळजाच्या सैतानाचे आहे व आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन नाचणारे आहोत. चीनने सरळ सरळ पाकच्या दहशतवादाला पाठिंबा दिला. युनोची भीती त्याने बाळगली नाही व अमेरिकेसारख्या राष्ट्रांची पर्वा केली नाही. याचा धडा आपल्या कूटनीतीवाल्या चाणक्यांनी घ्यायला हवा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दुबईतल्या इस्लामिक राष्ट्रांच्या परिषदेत हिंदुस्थानी परराष्ट्रमंत्र्यांनी सडकून भाषण केले हे मान्य, पण त्याच इस्लामी राष्ट्रांच्या संघटनेने कश्मीरबाबत केलेला ठराव हा आमच्या सोयीचा नव्हता हेसुद्धा विसरू नये. जगातला दहशतवाद गंभीर आहे. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्सने त्यावर नियंत्रण मिळवले. हिंदुस्थानच्या भूमीवर हा राक्षस थैमान घालतो आहे. हा विषय मसूद अजहरपुरता मर्यादित नाही. पाकिस्तानचे लष्कर व राज्यकर्त्यांच्या भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद राहिल्या आहेत. पाकड्यांनी पुलवामात आमचे चाळीस जवान मारले. आम्ही त्यांचे एक एफ-16 विमान पाडले. जैशच्या तळावर हल्ले करून नक्की किती आतंकवादी खतम झाले यावर हिंदुस्थानात प्रश्न उपस्थित होत आहेत. पुलवामा हल्ला हा हिंदुस्थानवरील हल्ला आहे. कश्मीरात मारला जाणारा प्रत्येक जवान म्हणजे हिंदुस्थानच्या काळजात घुसलेला वार आहे. कोणतेही युद्ध न करता पाकिस्तान आमची अशी हानी करीत आहे व आपण पुलवामा हवाई हल्ल्याचे राजकारण करण्यात धन्यता मानत आहोत. विरोधी पक्षांनी थोडे जबाबदारीने वागावे व सत्ताधारी पक्षाने संयम बाळगावा हाच त्यावरील मध्यम मार्ग आहे असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.