लोकांचा संयम सुटण्यापूर्वी कामांना वेग द्या, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून केंद्रातील आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वाखाली सरकारवर टीका केली. भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती मोहमद सईद यांच्या पक्षाशी केलेल्या युतीवरूनही त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे कान टोचले. मुफ्ती मोहमद सईद यांच्याविषयी आपली मतं काय होती? त्यांचे राजकारण काय होते? याचा विसर भाजपने पडू देऊ नये, असे सांगतानाच अमित शहा मुंबईत येऊन युतीचे राजकारण पुरे करा, असे सांगतात. मात्र, काश्मीरमध्ये पाकधार्जिण्या पक्षांसोबत युती करतात हे एक मोठे आश्चर्य आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. राज्यातील शेतकऱयांची कर्जमुक्ती व्हायलाच पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त केली.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेसवाल्यांच्या भुलभुलैयामुळे लोकं फसत गेले. आता त्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळेच दोन्हीकडच्या सरकारांनी लवकरात लवकर लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. लोकांच्या मनात सरकारांनी विश्वास निर्माण केला पाहिजे.
कर्जमुक्तीची भूमिका आपणच प्रथम मांडली असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, तुरुंगातल्या कैद्यांना, अतिरेक्यांना माफी मिळते. मग शेतकरी काय गुन्हेगार आहे काय? तो परिस्थितीने पिचलेला आहे. त्याला आधार द्यायचा असेल तर कर्जमुक्त केलेच पाहिजे. पण जर भविष्यात त्याने कर्ज काढले तर ते फेडण्याची ताकद त्याला दिली पाहिजे.
काश्मीरची आपल्याला चिंता वाटत असल्याचे सांगून ते म्हणाले, काही प्रवृत्ती जिथल्या तिथे ठेचाव्याच लागतात. त्यामुळे पाकिस्तानाला जशासं तसे उत्तर दिलेच पाहिजे. ती हिंमत मोदींमध्ये असल्याचे आपण मागेच बोललो होतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.