राज्यात अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी निराशेपोटी आत्महत्या करीत असताना त्यांचे अश्रू पुसण्यास काँग्रेसच्या पुढाऱ्यांना वेळ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आत्महत्या न करता मतांची मारपीट करावी, तरच काँग्रेसचा नायनाट होईल, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
िहगोली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ रामलीला मदानावर आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. रिपाइं नेते रामदास आठवले, सेनेचे सुभाष देसाई, डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार गजानन घुगे आदींची उपस्थिती होती. ठाकरे यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पाणीटंचाई, विजेचे भारनियमन, भ्रष्टाचार याविरुद्ध शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला. गारपिटीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज, वीजबिल माफ करून दिलासा देण्याचे सोडून आचारसंहितेच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले. त्यामुळे कर्जाच्या ओझ्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आत्महत्या करू लागला. गारपीटग्रस्त शेतकरी सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकत नाहीत, तर त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मागत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी व वीजबिल माफीचे काम सत्ताधाऱ्यांचे आहे, असे ते म्हणाले.
देशाच्या विजयाचे प्रतीक असलेली विक्रांत नौका भंगारात काढली. काँग्रेसवाले आता देश भंगारात काढतील. विक्रांतची स्मृती जपायची नाही, तर आदर्शची आठवण ठेवायची काय? असा टोलाही त्यांनी लगावला. महात्मा गांधींची काँग्रेस संपली असून, ही सोनिया गांधींची काँग्रेस असल्याची खिल्लीही त्यांनी उडविली.
वानखेडेंचा आरोप, सातवांकडून इन्कार!
वानखेडे यांनी आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत जोरदार टीका केली. बिहारमधील पक्षांतर्गत निवडणुकीसंदर्भात दाखल गुन्हा, तसेच वॉरंट निघाल्याचा मुद्दा उपस्थित केला. पोलिसांनी सातव यांना अटक न केल्यास जिल्हा पोलीस कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. गजानन घुगे, डॉ. मुंदडा, आठवले यांचीही भाषणे झाली. मात्र, वानखेडे यांनी केलेल्या आरोपांविषयी सातव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याचा इन्कार केला. हे आरोप बिनबुडाचे असून वानखेडेंवर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सातव यांनी स्पष्ट केले. हा संपूर्ण विषय बिहार उच्च न्यायालयाने निकाली काढला आहे, असेही त्यांनी सांगितले.