शिवसेना आणि भाजपाच्या युतीनंतर टीका करणाऱ्यांना सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. तलवार म्यानबंद नाही वारा आमच्या दिशेने वळला या मथळ्याखाली अग्रलेख लिहण्यात आला असून यामध्ये युतीमागील राजकारण आणि पुन्हा युती करण्यामागील कारण सांगण्यात आले आहे. जनतेच्या मनात कमी, पण आमच्या राजकीय विरोधकांच्या डोक्यात प्रश्नांचे किडे जरा जास्तच वळवळत आहेत. ‘युती’मुळे हे किडेमकोडे साफ चिरडले जातील या भीतीतून त्यांची वळवळ सुरू झाली आहे, असा टोला लगावला आहे.

आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले . इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही.

दबाव आणि मुस्कटदाबी ही भुते आम्ही शिवसेनेच्या मानगुटीवर कधीच बसू दिली नाहीत. आम्ही आमचा बाणा जपला, जपत राहू. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली नाही. 2014 मध्ये भाजपकडून रीतसर काडीमोड झाला असतानाही पुन्हा एकत्र कसे? नक्की कोणत्या मुद्द्यांवर एकत्र येत आहात? महाराष्ट्रात ‘युती’च्या चर्चेला तसा पूर्णविराम मिळाला आहे. काही पोटावळ्यांना युती झाली तरी, ‘का झाली?’ असा मुरडा उठला होताच व होत नव्हती तेव्हा, ‘छे, छे, शिवसेना फारच ताणून धरते बुवा. हे काय सुरू आहे!” असले प्रश्न पडतच होते. असल्या पडेल प्रश्नांना उत्तरे देत बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हितासाठी जी नवी जुळवाजुळव केली आहे ती घेऊन पुढे जावे यातच सगळ्यांचे हित आहे. असे सामनामध्ये म्हटले आहे.