अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बॉलिवूडमधील कलाकारांवर आरोप केले जात आहे. ड्रग्ज प्रकरणात अनेक कलाकारांची नावं घेतली जात आहे. बॉलिवूडमधील या वादावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं. बॉलिवूडवर केल्या जात असलेल्या आरोपांवर दुःख व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात होत असलेल्या फिल्मसिटीवरही भूमिका मांडली. “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

करोनामुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून, याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासन दिलं. “मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही, तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलिवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनत आहे. या बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हे एक मोठं मनोरंजन उद्योग क्षेत्र असून, या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते. तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

सिनेमागृहे सुरु करण्यासाठी महत्वाचा काळ -अमित देशमुख

“दसरा, दिवाळी, नाताळ असे लागोपाठ येणारे सण यामुळे या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. लॉकडाऊन कालावधीत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे बंद करण्यात आली होती. आता सिनेमागृहे सुरु केल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी येतील. त्यामुळे आताचा काळ हा महत्वाचा आहे. परंतु सिनेमागृहे सुरु करण्याची परवानगी दिल्यानंतरही सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची आणि स्वच्छतेची काळजी यालाच प्राधान्य असणार आहे. सिनेमागृहे सुरु झाल्यामुळे या क्षेत्राला गती मिळणार आहे,” असं अमित देशमुख म्हणाले.