News Flash

उलट इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात येतील; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

"उद्योजकांनी ब्रँड अम्बॅसिडर बनावं"

उलट इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात येतील; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
(संग्रहित छायाचित्र)

“महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत. उलट इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील,” असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वेब माध्यमातून या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, आयएमसीचे अध्यक्ष राजीव पोद्दार यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मॅग्नेटीक महाराष्ट्रासाठी इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मॅग्नेटीक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्राला एक इतिहास आहे. महाराष्ट्र एक सर्वार्थाने वेगळे राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल, तर शक्य होणार नाही. महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येते आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्रातील या बदलाचे ११३ वर्षे जुने साक्षीदार आहे. त्यामुळेच तुम्हीच महाराष्ट्राचे ब्रॅंड अम्बॅसिडर आहात. महाराष्ट्राच्या यशाची गाथा, गोष्टी तुम्हीच इतरांना सांगू शकता. कुठलीही अडचण असेल, तर ती दूर करण्यात सरकार तुमच्या सोबत असते. हे तुम्हाला सांगता येईल. यामुळे महाराष्ट्रात देशभरातून नव्हे परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळेल. यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे दूत व्हावे,” अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

“इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्सला ११३ वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. “इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स सोबत जुने स्नेहबंध आहेत. यापुर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचे व्हिजन काय असेल, याबाबत आपण चर्चा करत असू. पण आता हे स्वप्न आपल्याला सत्यात आणण्याची संधी मिळाली आहे. संस्थेने स्वातंत्र्यांच्या आधीचा काळही बघितला आहे. आता युग बदलले आहे. देशही बदलला आहे. देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे आणि याबरोबरच आपले नाते अधिक घट्ट झाले आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“कोविडचे संकट अजूनही संपलेले नाही. पण या संकटातही पुढे कसे जायचे याचा आपण मार्ग शोधतो आहोत. चेंबरशी संलग्न आपण सर्व हे महाराष्ट्राच्या परिवाराचा भाग आहात. त्यामुळे परिवारातील आपल्या दोघांचेही उद्द‍िष्ट एक आहे. यातून आपल्याला राज्याला पुढे न्यायचे आहे. अडचणीचा काळ सुरु आहे. पण या काळात नोटबंदीत जसा पैसा गायब झाला, तसा गायब झाला नाही. आता चक्र फिरू लागले आहे. त्यामुळे आता आत्मविश्वासाने पुढे जाऊ या. त्यासाठी आम्ही ईझ ऑफ डुईंग बिझनेस सारख्या संकल्पना राबवित आहोत. त्यामध्ये तुम्हा उद्योजकांकडून आणखी सूचना याव्यात. नवीन काही करू शकतो का, त्याबाबत संकल्पना मांडण्यात याव्यात,” असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

“देशातील आणि जगातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात या असे सांगता येईल”

“परवाना पद्धती सुलभ व्हावी यासाठी एक खिडकी पद्धतीही राबवित आहोत. दरम्यानच्या काळात आपण ६० हजार कोटींचे सामंजस्य करार केले. जूनमध्ये झालेल्या या करारांनुसार संबंधित उद्योजकांचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी लक्ष घातले जात आहे. यातून महाराष्ट्रात एक लाख कोटीहून अधिक गुंतवणूक येईल, असा विश्वास आहे. त्यासाठी आपण एकत्रित काम करताना मिशन एंगेज महाराष्ट्र हे अभियान उपयुक्त ठरेल. या अभियानातून तुम्हाला महाराष्ट्राचा चेहरा म्हणूनही काम करता येईल. देशातील आणि जगातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात या असे सांगता येईल. गुंतवणूक, उद्योग यांच्यासोबतच आपल्याला रोजगार संधी निर्माण व्हाव्यात यावा भर द्यावा लागेल. सामान्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न सुटला, तरच होणाऱ्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ, खरेदीदार मिळू शकेल. यासाठी आपण महाजॉब्ज पोर्टलची व्यवस्था केली आहे. यातून जास्तीत जास्त लोकांच्या हाताला काम मिळेल असे प्रयत्न करू. अशा अडचणीच्या काळातही महाराष्ट्राकडून जगापुढे आगळा आदर्श ठेवला जाईल. यात तुमच्या सोबत सरकार पूर्ण ताकदीने राहील. महाराष्ट्र बलवान आहेच. त्याला आपण एकत्र येऊन आणखी बलवान करू या,” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2020 7:27 pm

Web Title: uddhav thackeray chambers of commerce indian chambers of commerce webinar bmh 90
Next Stories
1 “दोन शब्द मराठीत धड बोलता येत नाही, राणेंची ठाकरेंवर टीका करायची लायकी आहे का?”
2 “उर्मिला यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे, पण…”
3 “सैनिकांच्या जागेवर ‘आदर्श’ इमारत उभी करताना महाराष्ट्राची प्रगती आठवली नाही?”
Just Now!
X